ब्राझील : जेलमध्ये गँगवॉर, ५७ कैद्यांचा मृत्यू

रिओ : पुढारी ऑनलाईन
ब्राझील येथील एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटात मोठा हिंसाचार घडला. यात ५७ कैद्यांचा मृत्यू झाला. ब्राझील सरकारने याबाबत माहिती दिली आहे. उत्तर ब्राझीलच्या पारा येथील एका जेलमध्ये सोमवारी हा हिंसाचार घडला.
सुत्रांच्या माहितीनुसार, पारा येथील अल्टामीरा जेलमध्ये सोमवारी अचानक दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार घडला. हा थरार तब्बल पाच तासाहून अधिक वेळ चालला. अखेर सैन्याचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने हिंसाचारावर नियंत्रण आणले.
हिंसाचार नियंत्रणात आणल्यानंतर जेलमधील दृश्य अत्यंत भीतीदायक होते. जेलमध्ये १६ कैद्यांचे शिर धडापासून वेगळे झाले होते, तर जेलच्या एका भागात आग लावल्यामुळे या आगीत ४१ जण जळून खाक झाले होते.
जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, जेलच्या एका भागात एका गटातील काही कैदी अल्पोपहार करत असताना त्यांच्यावर दुस-या गटातील कैद्यांनी हत्यानिशी अचानक हल्ला केला. यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी जेलमधील सुरक्षा रक्षकांनी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचा-यांनाही मार खावा लागला. यात चार पोलिस जखमी झाले. हिंसचारावर नियंत्रण आनल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिसाचारानंतर जेलमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.