काश्मीरवरून गळा काढता, तर मग 'त्या' १० लाख मुस्लिमांसाठी मूग गिळून गप्प का? | पुढारी

काश्मीरवरून गळा काढता, तर मग 'त्या' १० लाख मुस्लिमांसाठी मूग गिळून गप्प का?

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असतानाही पाकिस्तानचे नाक खुपसणे काही नवीन नाही. काश्मीरसाठी अत्यंत संवेदनशील असलेले कलम ३७०  केंद्र सरकारकडून हद्दपार करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट सुरू केला, पण त्यांना आंतरराष्ट्रीय फटकार प्रत्येकवेळी मिळाली आहे. 

आता नव्याने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय फटकार बसली आहे. पाकिस्तानचा दुतोंडी चेहरा अमेरिकेने पुन्हा एकदा समोर आणताना चीनमधील बंदिस्त मुस्लिमांबद्दल त्याच पातळीवर काळजी करा असे सुनावले. अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाचे काळजीवाहू सहाय्यक सचिव ॲलीस वेल्स यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान चीनच्या भूमिकेवरून एक शब्द बोलत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

चीनमध्ये सुधारणेच्या नावाखाली जवळपास १० लाख ‘युईघूर’ मुस्लिमांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर तुर्की मुस्लिमांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मला पाकिस्तानकडून त्या मुस्लिमांसाठी तेवढीच तत्परता आणि काळजी पाकिस्तानकडून अपेक्षित आहे. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरवरून मुद्दा उपस्थित केल्यानंतर वेल्स यांनी इम्रान खान यांना चांगलेच फटकारले.  

इम्रान खान यांना युईघूर मुस्लिमांना विचारण्यात आले असता त्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. चीनशी आमचे ‘स्पेशल रिलेशनशीप’ असल्याचे नमूद करत तो मुद्दा खासगीमध्ये उपस्थित करत असल्याचे इम्रान खान यांनी प्रश्नाला बगल देताना सांगितले. अवैधपणे मुस्लिमांना ताब्यात घेतल्याने जगभरातून चीनवर सडकून टीका होत आहे. 

Back to top button