अन्य देशांत कोरोना विषाणूंची व्याप्ती वाढली | पुढारी

अन्य देशांत कोरोना विषाणूंची व्याप्ती वाढली

तेहरान / रोम : वृत्तसंस्था

इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून या देशातील कोरोना बळींची संख्या 5 वर पोहोचली आहे. इराणमध्ये कोरोनाचे दहा नवे रुग्ण आढळून आले आहेत. इराणमधील कोरोना बाधितांची संख्या आजअखेर 28 झाली आहे. चीनव्यतिरिक्त  अन्य देशांतून कोरोना विषाणूची व्याप्ती वाढली आहे. इटलीतही कोरोना विषाणूने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या देशातील अनेक शहरांतून कोरोनामुळे घबराट पसरली आहे.

इराणमध्ये बुधवारी कोरोनाचा (कोविड-19) पहिला रुग्ण आढळून आला. कॉम शहरात दोन वयोवृद्धांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल आले आणि या अहवालांसह पश्चिम आशियात कोरोनाने मृत्यू ओढविल्याचे पहिल्यांदा समोर आले. नंतर इराणमध्ये 785 संशयितांची तपासणी करण्यात आली. इराणमध्ये कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच इराकने इराणमध्ये जाण्या-येण्यावर निर्बंध घातले आहेत.

इटलीमध्ये कोरोनाला 2 जण बळी पडले आहेत. कोडोगनो शहरात दुसरा रुग्ण मरण पावला आणि या शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. 15 हजार लोकसंख्येच्या या छोट्याशा शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आयसोलेशन वॉर्डातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घबराट आणखीच वाढली आहे. एका युवकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.रोममध्ये तिघांवर आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. लोम्बार्डीत 16 संशयित आढळले.

लॅबेनॉनमध्येही कोरोना

बैरूत : लॅबेनॉनमध्ये एका 45 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. आखणी दोघे संशयित आढळले आहेत.

चीनमध्ये 200 कैद्यांत संक्रमण

चीनच्या कारागृहांमध्येही कोरोना पोहोचला आहे. विविध कारागृहांमध्ये मिळून 200 कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शेडाँग प्रांतातील रेनचेंग कारागृहात 7 गार्ड आणि 200 कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शिवाय पूर्व झेजियांग प्रांतातील शिलिफेंग कारागृहात 34 रुग्ण आढळले आहेत. चीनमध्ये 1100 नवे रुग्ण आढळल्याने संक्रमितांची संख्या 76 हजारांवर गेली आहे.   मृतांची संख्या 2500 वर गेली आहे.

दक्षिण कोरियात ४८ रुग्ण

दक्षिण कोरियात कोरोनाचे नवे 48 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 204 झाली आहे. दायगूत 42, तर राजधानी सेऊलमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत.

कोरोना विषाणूचे संक्रमण थांबविता येण्याच्या शक्यता कमी होत चालल्या आहेत. म्हणून आम्ही वेगाने उपाययोजना करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून केले आहे. सर्व देशांनी कोरोनाविरोधात निधी उपलब्ध करणे, या घडीला सर्वांत महत्त्वाचे आहे.
टेड्रॉस अ‍ॅधानोम गॅब्रियेसीस, 

अध्यक्ष, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)

Back to top button