गोगलगायीच्या नव्या प्रजातीला ग्रेटा थनबर्गचे नाव | पुढारी

गोगलगायीच्या नव्या प्रजातीला ग्रेटा थनबर्गचे नाव

लंडन : पुढारी ऑनलाईन 

लहान वयातच पर्यावरणाबाबत आवाज उठवणारी स्विडीश पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आता जगभर तिच्या याबाबतच्या चळवळीमुळे ओळखली जाऊ लागली आहे. आता तिला एक नवा सन्मान देण्यात आला आहे. 

ब्रुनेईमध्ये संशोधकांनी गोगलगायीची एक नवी प्रजाती शोधली असून, तापमानाबाबत संवेदनशील असलेल्या या प्रजातीला ग्रेटाचे नाव देण्यात आले आहे. या गोगलगायीला आता ‘क्रास्पेडोट्रोपिस ग्रेटाथनबर्ग’ असे नाव दिले आहे. 

थनबर्गच्या पिढीला अशा समस्यांवरही उपाय शोधावा लागेल ज्या त्यांनी निर्माण केलेल्या नाहीत. या गोगलगायीला तिचे नाव देण्यामागे आमचा हाच उद्देश आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. ही गोगलगाय दोन मि.मी. लांब आणि १ मि.मी. रुंद आहे.

यापूर्वी ग्रेटा थनबर्गचे नाव एका कीटकास देण्यात आले आहे. या कीटकाचा शोध १९६५ मध्ये लागला होता, मात्र आतापर्यंत याला नाव देण्यात आलेले नव्हते. पर्यावरण संरक्षणाबद्दल ग्रेटाचे असलेल्या योगदानामुळे हे नाव देण्यात आले आहे. या कीटकास ‘नेलोपटोड्स ग्रेटी’ हे नाव देण्यात आले. 

एंटोमोलॉजिस्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हा किडा १ मिमी लांब असून, त्याला डोळे आणि पंख देखील नाहीत. या कीटकाच्या डोक्यावर असलेले एंटीने पिगलेट्स सारखे दिसतात. नॅच्युरल हिस्ट्री म्यूझियम, लंडनच्या एक्सपर्टनुसार, ग्रेटा ही निर्भिड आहे व ती जगासमोर पर्यावरण संरक्षण अभियानासंबंधी न घाबरता आपले मत मांडते. तिचे काम प्रशसनीय आहे.

म्यूझियमचे सायंटिफिक असोसिएट डॉ. मायकल डर्बे यांनी सांगितले की, हे कीटक निसर्गशास्त्रज्ञ डॉ. विलियम ब्लॉक यांना १९६५ केनियामध्ये आढळले होते. त्यानंतर त्यांनी १९७८ ला नॅच्युरल हिस्ट्री ऑफ म्यूझियमला हे कीटक दिले.

या कीटकाचे नाव ठरवण्यासाठी ५० वर्षांपेक्षा अधिक वर्ष लागली. हा किडा टिलिएडी कुटूंबातील आहे. जे जगातील सर्वात छोट्या कीटकांचे कुटूंब आहे.

Back to top button