डोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प ‘बाहुबली’च्या रुपात, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बाहुबली हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा भारतात येत आहेत. आता तुम्ही विचार कराल की, बाहुबली आणि ट्रम्प हे दोन विषय घेऊन अचानक चर्चा का केली जात आहे. याला कारण म्हणजे ‘बाहुबली’ चित्रपटातील एक मीमे केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत डोनाल्ड ट्रम्प बाहुबलीच्या रुपात दिसत आहेत आणि त्यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून रिट्विट केला आहे. 

@Silmemes1 या ट्विटर हँडलने १ मिनिट २१ सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये अ‍ॅनिमेटेड पात्रांसह भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री दर्शविली गेली आहे. या व्हिडिओमध्ये बाहुबली चित्रपटातील एका फुटेजचा वापर करण्यात आला आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बाहुबलीच्या रुपात दाखवले आहे. ते त्यांची मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड यांना खांद्यावर घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. तसेच या व्हिडिओत त्यांची पत्नी मेलेनिया या सुद्धा ट्रम्प यांच्या सोबत रथातून रपेट मारताना दिसत आहेत. संपूर्ण मीम व्हिडिओमध्ये बाहुबलीचे लोकप्रिय गाणेही आहे. 

विशेष बाब म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. ट्रम्प यांनी ट्वीट करून लिहिले की, ‘मी भारतातल्या महान मित्रांना भेटण्यास उत्सुक आहे.’

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प २४-२५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारत दौर्‍यावर येत आहेत. यावेळी त्याच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका आणि जावई जेरेड हे देखील उपस्थित असणार आहेत. ट्रम्प प्रथम गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहोचतील. जेथे पीएम मोदींसमवेत ते भव्य रोड शोमध्ये भाग घेतील. यानंतर अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम होणार आहे. तसेच मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भारत भेट गेल्या काही काळापासून चर्चेत राहिली आहे आणि जगाच्या नजरा या अमेरिका-भारत मैत्रीवर आहेत.

Back to top button