जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध तोडल्याची ट्रम्प यांची घोषणा | पुढारी

जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध तोडल्याची ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध पूर्णपणे तोडत असल्याची घोषणा केली. त्यांनी जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुले झाले आहे. त्यांना सुरुवातीलाच कोरोनाचा जागतिक प्रसार रोखण्यात अपयश आले आहे असा आरोप केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी महिन्याभरापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचा अर्थपुरवठा बंद करुन इशारा दिला होता. त्यानंतर शुक्रवारी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध तोडल्याची घोषणा केली. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातले बाहुले झाले आहे असा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी जोपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल करत नाही तोपर्यंत त्यांचा अर्थपुरवठा स्थगित ठेवण्यात येईल असे सांगितले होते. पण, शुक्रवारी ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना सांगितलेल्या सुधारणा करण्यात अपयशी ठरल्यामुळे आम्ही आजपासून त्यांच्याशी असलेले संबंध तोडत असल्याची घोषणा केली. 

ट्रम्प यांनी ‘कोरोना विषाणूबाबत चीनकडून जगाला काही उत्तरे हवी आहेत. आपल्याला पारदर्शकता हवी आहे.’ असे सांगितले. तर एका रिपब्लिकन नेत्याने सांगितले की अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला पूर्वी दिलेला पैसा इतरत्र वळवणार आहे. हा पैसा जागतिक स्तरावर इतरत्र अत्यंत आवश्यक असलेल्या सार्वजनिक आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी वळवण्यात येईल.  

दरम्यान, चीनने वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्याची माहिती दाबून ठेवली हा अमेरिकेचा आरोप चीनने स्पष्ट शब्दात धुडकावून लावला आहे.  त्यांनी अमेरिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात गलथानपणा केला आहे आणि आता या अपयशाचे खापर ते जागतिक आरोग्य संघटनेवर फोडत आहेत असा आरोप केला आहे. 

अमेरिका ही जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक वित्तपुरवठा करते. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला प्रतिवर्षी 400 मिलियन अमेरिकन डॉलर वित्तपुरवठा करत होती. या आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने वित्तीय मदत मिळवण्यासाठी स्वतंत्र फाऊंडेशन स्थापन केले आहे. यात वैयक्तीक देणग्या स्विकारल्या जाणार आहेत. संघटनेला आशा आहे की यामुळे सामाजिक संस्था आणि वैयक्तीक देणग्यांमुळे कोरोना सारख्या संकटात संघटनेचे अधिपत्य संघटनेकडेच राहील. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अॅधनोम घेब्रेसिस यांनी या नव्या फाऊंडेशनचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी वित्तपुरवठा थांबवण्याचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बजेटमध्ये देशांनी दिलेल्या देणग्यांचा मोठा वाटा असल्याने, त्यामुळे त्या देशांचे हितसंबंध असलेल्या क्षेत्रातच त्यांना खर्च करावा लागतो.

Back to top button