कोरोना टॉप टेन यादीत भारत आता नववा  | पुढारी

कोरोना टॉप टेन यादीत भारत आता नववा 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

जगभरातील संक्रमितांची संख्या आजअखेर 60 लाख 58 हजार 25 झाली असून, पैकी 26 लाख 70 हजार 627 लोक बरे झाले आहेत. मृत्यूचा आकडा 3 लाख 67 हजार 325 झाला आहे. कोरोना टॉप टेन देशांच्या यादीत भारताने तुर्कस्तानला मागे टाकले आहे. सर्वाधिक संक्रमित देशांच्या यादीत भारत आता नवव्या स्थानी आला आहे. यापूर्वी इराणला मागे टाकून भारत दहाव्या स्थानी आला होता. दरम्यान, ‘नासा’ने 3 भारतीय कंपन्यांसह 18 कंपन्यांना व्हेंटिलेटर तयार करण्याचे परवाने दिले असून, यात अमेरिकेतील 8, तर ब्राझीलच्या 3 कंपन्यांचाही समावेश आहे. अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीस, भारत फोर्ड लिमिटेड आणि मेधा सर्नो ड्राईव्स लिमिटेड या भारतीय कंपन्यांना व्हेंटिलेटर तयार करण्याचा परवाना मिळाला आहे.

इजिप्त सरकारने शनिवारी खासगी वाहतूक आणि सरकारी कार्यालयांतून मास्क परिधान करण्याचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास पंतप्रधान मुस्तफा मडबॉली यांनी दंडाची तरतूद केली आहे. इजिप्तमध्ये पुढच्या 2 आठवड्यांसाठी रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहणार आहे. या देशात 879 लोक मरण पावले असून, 22 हजार 82 संक्रमित आहेत.

रशियात दिवसभरात 8,952 संक्रमित 

रशियात गेल्या 24 तासांत 8,952 संक्रमित आढळले असून, यादरम्यान 181 जणांचा मृत्यू झाला आहे. संक्रमितांची संख्या 3.96 लाखांवर गेली असून, अमेरिका आणि ब्राझीलनंतर रशिया हा तिसरा सर्वाधिक संक्रमित देश आहे.

तुर्कस्तानात 2 महिन्यांनंतर मशिदींमध्ये नमाज अदा केली गेली. मे महिन्यात एकापाठोपाठ सवलती सरकारने जाहीर केल्या असून, कटिंग सलून, शॉपिंग मॉल आणि ब्यूटिपार्लर पूर्ववत सुरू झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष रेजेप तय्यप अर्दोआन यांनी सोमवारपासून रेस्टॉरंट, वाचनालये, कॅफे तसेच बिचेस्ही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

अमेरिका : दिवसभरात 1,225 मृत्यू

अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,225 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 1 लाख 4 हजार 542 झाला आहे. देशातील सर्वाधिक  संक्रमित न्यूयॉर्क राज्यात 8 जूनपासून अनेक निर्बंध सैल करण्यात येतील. बांधकामे व उत्पादनाला परवानगी दिल्यानंतर 4 लाख लोक पूर्ववत कामावर जाऊ शकतील, असे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांनी सांगितले. बस आणि रेल्वे नियमितपणे सॅनिटाईज्ड केल्या जात असून, सार्वजनिक वाहतूक यंत्रणा लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित असेल. वॉशिंग्टनमध्ये 3 महिन्यांपासून लागू असलेला ‘स्टे-अ‍ॅट-होम’ (घरीच राहा) आदेश 31 मे रोजी मागे घेण्यात येणार आहे.

ब्राझील : 24 तासांत 1,124 मृत्यू

ब्राझीलमध्ये 27 हजार 944 लोक मरण पावले आहेत. दिवसभरात 1,124 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या 4.68 लाखांवर गेली आहे. 

फ्रान्स : 24 तासांत 52 मृत्यू

फ्रान्समध्ये गेल्या 24 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा आता 28 हजार 714 आहे. 1 लाख 1 हजार 390 रुग्ण विविध दवाखान्यांतून दाखल आहेत. पैकी 17 हजार 904 जण अत्यवस्थ आहेत. 67 हजार 803 जण बरे झाले असून, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आजअखेर 28 हजार 714 मृत्यू झाले आहेत.

Back to top button