कृष्णवर्णीयांच्या मृत्यूवर अमेरिकेत हिंसक निदर्शने | पुढारी

कृष्णवर्णीयांच्या मृत्यूवर अमेरिकेत हिंसक निदर्शने

मिनेसोटा : वृत्तसंस्था

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड याच्या मानेवर गुडघा ठेवून त्याची हत्या केल्याचे तीव्र पडसाद अमेरिकेत उमटत आहेत. देशाच्या 20 शहरांमध्ये हिंसक निदर्शने आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून टेक्सास राज्यातील ह्युस्टनमध्ये पोलिसांनी 200 वर आंदोलकांना अटक केली आहे. निदर्शनांदरम्यान डेट्रॉएटमध्ये एका 19 वर्षांच्या युवकाचा गोळीबारात मृत्यू झाला.

पोर्टलँडमध्ये प्रशासनाने जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. मिनेपोलिसमध्ये  50 जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक शहरांतून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. जॉर्जची हत्या करणार्‍या पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत जॉर्ज फ्लॉयड याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्याच्या मृत्यूची घटना अत्यंत दु:खद असून जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या कुटुंबास दिली.

Back to top button