तर आंदोलनकर्त्यांचा भयानक श्वान आणि शस्त्रांशी सामना झाला असता : ट्रम्प  | पुढारी

तर आंदोलनकर्त्यांचा भयानक श्वान आणि शस्त्रांशी सामना झाला असता : ट्रम्प 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जर आंदोलनकर्त्यांनी व्हाईट हाऊसचे कंपाऊड तोडून आत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भयानक कुत्र्यांचा आणि मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या सर्वात भयावह शस्त्रांचा सामना करावा लागेल.’ असे वक्तव्य शनिवारी केले.  त्यांनी हा धमकी वजा इशारा कृष्णवर्णीय व्यक्ताचा पोलिस कारवाईत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना दिला. 

सोमवारी मिनेआपोलिस येथे जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलिस कारवाई दरम्यान एका श्वेत पोलिसाने अमानुषपणे त्यांच्या गळ्यावर गुडघा रेटल्याने मृत्यू झाला होता. त्या विरोधात संपूर्ण अमेरिकेत जोरदार प्रदर्शने सुरु आहेत. काही भागात या प्रदर्शनांना हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथेही शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. ज्यावेळी हे आंदोलक संध्याकाळी व्हाईट हाऊसजवळील लाफायेट स्क्वेअर येथे मोठ्या संख्येने जमा झाले त्यावेळी व्हाईट हाऊस लॉकडाऊन करण्यात आले. 

कृष्णवर्णीयांच्या मृत्यूवर अमेरिकेत हिंसक निदर्शने

दरम्यान, आंदोलक आणि व्हाईट हाऊसचे सुरक्षा अधिकारी यांच्यात धक्काबुक्कीचीही घटना घडली. या प्रकारानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची सुरक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याचे कौतुक केले. त्यांनी ‘अत्यंत कूल. मी आतून सगळं काही पाहत होतो मला यापेक्षा सुरक्षित कधी वाटले नाही. स्थिती व्यावसायिकपणे हाताळली. मोठा जमाव जमला होता तो हेतू पुरस्कर जमवला होता. पण, कोणालाही व्हाईट हाऊसची भींत लांघता आली नाही. जर त्यांनी ती लांघली असती तर त्यांना भयानक कुत्रे आणि अत्यंत भयानक शस्त्रांचा सामना करावा लागला असता. अनेक सिक्रेट सर्व्हिसेसचे एजंट वाटच पाहत होते.’ असे वक्तव्य केले. 

त्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटची मालिका पोस्ट केली, त्यात ट्रम्प यांनी त्यांच्या सर्व समर्थकांना एक्झिक्युटिव्ह मेन्शनच्या बाहेर रॅली करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की ‘आज रात्री मला व्हाईट हाऊसवरील “मेगा” नाईट समजली.’ डोनाल्ड ट्रम्प यांचे मेगा स्लोगन म्हणजे ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन.’ 

चीनची इवल्याशा तैवानला युद्धाची धमकी

याचबरोबर ट्रम्प यांनी वॉशिंग्ट डी. सी.चे महापौर म्युरेल बोव्हसेर यांनी अमेरिकी गुप्तचर कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पोलिस पाठवण्यास नकार दिल्याचाही आरोप केला. पण, वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी महापौरांच्या कार्यालयाने आणि डी. सी. पोलिसांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर आंदोलनाच्या आडून लूटपाट केली तर शूट करण्यात येईल अशा आशयाचा इशारा दिला होता. ‘लूटिंग झाले तर शूटिंग होणार’ या ट्विटवरुन ट्विटरने त्यांना वॉर्निंग दिली आहे. तर डेमॉक्रॅट पक्षाने या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 

Back to top button