नेपाळने दाखवले भारताचे तीन भाग आपल्‍या हद्दीत  | पुढारी

नेपाळने दाखवले भारताचे तीन भाग आपल्‍या हद्दीत 

काठमांडू : पुढारी ऑनलाईन

भारत आणि नेपाळ या दोन देशांमधील संबंध सीमाप्रश्नावरून गेल्‍या काही दिवसात कमालीचे ताणले गेले आहेत. त्‍यातच आज नेपाळ सरकारने आपल्‍या देशाच्या नव्या राजकीय नकाशातील बदला संदर्भातील संविधान संशोधन विधेयक संसदेत सादर केले आहे. नेपाळच्या कायदेमंत्री शिवमाया तुंबाहंफे यांनी या नव्या नकाशासंबंधातील बदलासंदर्भात विधेयक आपल्‍या संसदेत सादर केले. या नव्या नकाशामध्ये भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्‍पियाधुरा या भागांना नेपाळने आपल्‍या हद्दीत दाखवले आहे. 

गेल्‍या काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमधील संबंध सीमाप्रश्नावरून बिघडले आहेत. असे असले तरी नेपाळ हा भारताचा जुना मित्र आहे. दरम्‍यान नेपाळी काँग्रेसने नेपाळच्या नकाशातील बदलासंदर्भातील संविधान संशोधन बिलाचे समर्थन केले आहे. लिपुलेख, लिम्‍पियाधुरा आणि कालापानी या भागाला नेपाळला आपल्‍या देशात सामिल करायचे आहे. हे पाउल नेपाळच्या नकाशाला बदलण्यासाठी उचलण्यात आले आहे. 

जेंव्हा नेपाळने आपल्‍या राजकीय नकाशामध्ये भारताच्या क्षेत्राला आपल्‍या हद्‍दीत असल्‍याचे म्‍हटले होते तेंव्हा भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया समोर आली होती. यावर भारताच्या परराष्‍ट्र मंत्रालयाने नेपाळने भारताच्या सार्वभौमत्‍वाचा सन्मान केला पाहिजे असे म्‍हटले होते. 

परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अनुराग श्रीवास्‍तव यांनी नेपाळ सरकारला आवाहन करत अशा प्रकारे बनावट कार्टोग्राफिक प्रकाशित करू नये असे म्‍हटले होते. तसेच भारताच्या सार्वभौमत्‍वाचा तसेच भौगोलिक अखंडतेचा सन्मान करावा असे म्‍हटले होते. 

नेपाळ सरकारच्या भूसंसाधन मंत्रालयाने नेपाळच्या नव्या नकाशामध्ये भारताच्या कालापानी, लिपुलेख आणि लिम्‍पियाधुरा भागाचा समावेश असलेला नवा संशोधित नकाशा प्रसिध्द केला होता. नेपाळच्या कॅबिनेट सदस्‍यांनी या नकाशाला पाठिंबा दिला होता. मात्र भारताने यावर तात्‍काळ आक्षेप घेतला होता. 

Back to top button