ट्रम्प प्रशासनाकडून योगी सरकारचे अनुकरण | पुढारी

ट्रम्प प्रशासनाकडून योगी सरकारचे अनुकरण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

सीएएविरोधी आंदोलनातून दिल्ली आणि उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक दंगलीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलीत सहभागी नागरिकांची छायाचित्रे मुख्य चौकाचौकात लावली होती आणि त्यांच्याकडून सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याबद्दल भरपाई वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या होत्या. योगींची हीच कल्पना आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनही राबवत आहे. 

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड या नागरिकाच्या हत्येनंतर अमेरिकेत सातत्याने हिंसक आंदोलने, लूट होत आहेत. त्यामुळे आता ट्रम्प प्रशासनाने दंगलीत सहभागी लोकांचे फोटो ट्विटरवरून शेअर करत त्यांच्याविषयी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

सध्या हिंसक आंदोलने थांबली आहेत. त्यानंतर ट्रम्प यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओतून काढलेली एक डझनहून अधिक छायाचित्रे स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करून नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन  केले आहे.  

गेल्या दोन दिवसांपासून ट्रम्प सातत्याने अशी छायाचित्रे ट्विट करीत आहेत. दरम्यान, अमेरिकेत लेफायेट्टे पार्क येथे झालेल्या दंगलीतील संशयितांची पोस्टर्सही अनेक ठिकाणी लावण्यात आली आहेत.

प्रत्येक गुप्त माहिती ट्रम्पना दिली जात नाही

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना प्रत्येक गुुप्त माहिती दिली जात नाही, असा धक्कादायक खुलासा व्हाईटहाऊसने केला आहे. जी माहिती राष्ट्राध्यक्षांना गरजेची आहे केवळ तीच माहिती त्यांना दिली जात असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने शुक्रवारी एक बातमी छापली होती. त्यात म्हटले होते की, रशियाने अफगाणिस्तानातील तैनात अमेरिकी सैनिकांना मारण्यासाठी तालिबानला बक्षीस जाहीर केल्याचे म्हटले होते. याबाबत ट्रम्प यांना काहीही माहिती नव्हती, असेही व्हाईटहाऊसने म्हटले आहे. 

Back to top button