५ भारतीय अपहृत युवकांच्या प्रश्नावर चीनचे उत्तर, ‘अरुणाचल तर आमचाच!’ | पुढारी

५ भारतीय अपहृत युवकांच्या प्रश्नावर चीनचे उत्तर, ‘अरुणाचल तर आमचाच!’

इटानगर/बीजिंग : वृत्तसंस्था

चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसून अरुणाचल प्रदेशातील रहिवासी असलेल्या 5 भारतीय युवकांचे अपहरण केले. याबाबत भारतीय लष्कराकडून चीनला कळविण्यात आले असता, अरुणाचल प्रदेश तर दक्षिण तिबेट आहे म्हणजे तो आमचाच (चीनचा) भाग आहे, असे अधिकृत उत्तर उद्दाम चीनकडून आले आहे. भारतीय लष्कराने रीतसर तक्रार नोंदवूनही चीनच्या लाल सेनेने या तक्रारीची काहीही दखल घेतलेली नाही. वरून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने उर्मटपणाचा कळस गाठला. चीनच्या या मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेश तर आमचाच आहे! आम्ही कशाला असे करू?

अपहृत युवक भारतीय लष्करासाठी सामान वाहणे आदी स्वरूपाचे काम करत असत. एका बेपत्ता युवकाच्या भावाने याबाबत फेसबुकवर पोस्ट शेअर केली. नाचोलगत सीमेवर भारतीय सैन्याच्या  सेरा-7 पेट्रोलिंग पॉईंटवरून चिनी सैनिकांनी या युवकांना उचलून नेले. टोच सिंगकम, प्रसाद रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनू बाकेर आणि गारू डिरी अशी या युवकांची नावे आहेत.

Back to top button