ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु! | पुढारी

ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु!

लंडन : पुढारी ऑनलाईन 

औषध निर्मिती करणारी मोठी कंपनी ॲस्ट्राझेन्काने आपल्या कोरोनावरील लसीची चाचणी थांबवल्याने एकच खळबळ उडाली होती. पण, आज (दि.12) ॲस्ट्राझेन्काने त्यांच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सांगितल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. चाचण्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय ब्रिटीश वैद्यकीय आरोग्य नियामक मंडळाकडून परवानगी मिळाल्यानंतर घेण्यात आला. ब्रिटनमधील एका स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर आजारी पडल्याने चाचण्या थांबवल्या होत्या. 

कंपनीने आपल्या अधिकृत वक्तव्यात ‘ब्रिटनमध्ये ॲस्ट्राझेन्काने ऑक्सफर्ड कोरोना व्हायरस लसीचे ( AZD1222 ) वैद्यकीय चाचाण्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. याबाबत वैद्यकीय आरोग्य नियामक मंडळाने चाचाण्या पुन्हा सुरु करणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हा निर्णय घेतला.’ असे सांगितले. 

ऑक्सफर्ड विद्यापीठासह ॲस्ट्राझेन्काने स्वतः स्वयंसेवकांवर होत असलेल्या आपल्या चाचाण्या बंद केल्या होत्या. त्यांनी यावेळी एका स्वंयसेवकाला त्रास होऊ लागल्याने हा निर्णय घेतला होता. यानंतर एका स्वतंत्र समितीने सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला. यावेळी कंपनीने आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा एक प्रक्रियेचाच भाग असल्याचे सांगितले होते. 

या समितीने आपली चौकशी केली आणि वैद्यकीय आरोग्य नियामक मंडळाला ब्रिटनमधील चाचण्या पुन्हा सुरु करण्यास काही हरकत नसल्याचा अहवाल दिला. असे ॲस्ट्राझेन्काने सांगितले. ॲस्ट्राझेन्का लस ही जगातील 9 मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या लसींपैकी एक आहे. 

अमेरिकेत कंपनीने 12 पेक्षा जास्त ठिकाणावरील 30 हजार पेक्षा जास्त स्वयंसेवकांवर 31 ऑगस्टपासून चाचण्या घेत आहे. याच बरोबर ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेत छोट्या ग्रुपवर कंपनीकडून चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 

Back to top button