दक्षिण चीन समुद्र भारतीय नौदलाच्या टप्प्यात | पुढारी

दक्षिण चीन समुद्र भारतीय नौदलाच्या टप्प्यात

बँकॉक : पुढारी ऑनलाईन

हिंदी महासागरातही भारताला वेढा घालण्याचा चीनच्या कटाला काटशह देण्यास भारताने सुरुवात केली आहे. थायलंडमधील क्रा कालवा प्रकल्पात भारताने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामात भारताला यश येईल, अशीच चिन्हे आहेत. असे घडले तर दक्षिण चीन समुद्र भारतीय नौदलाच्या टप्प्यात येणार आहे. क्रा कालव्यामुळे अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन समुद्रातील अंतर कमी होणार आहे.

सामरिक द‍ृष्टीने महत्त्वाचा असलेला हा कालवा 135 कि.मी. लांबीचा आहे. कालव्यामुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रातील अंतर कमी होईल. या प्रकल्पावर चीनचा डोळा होता. मात्र, थायलंड सरकारने कालव्याचे काम चीनला देण्यास नकार दर्शविला आहे. दक्षिण थायलंडमध्ये क्रा कालवा तयार करण्याच्या प्रकल्पात अनेक देशांनी रस दाखविला आहे. अर्थात, थायलंडने चीनचा उल्लेख टाळलेला नाही; पण प्रकल्पासाठी भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चीनला एकहाती हे काम हवे होते. भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ही तर सध्या चीनविरुद्ध एकत्र आलेली आघाडी आहे. या आघाडीसोबत चीन येणार नाही, हे थायलंडला ठाऊक आहे. मुळात आधीच थायलंडने चीनसोबत झालेल्या पाणबुडी खरेदीच्या करारावर स्थगिती आणलेली आहे. आगाऊ रक्‍कम देण्यासही नकार दिला आहे.

Back to top button