समुद्री लुटारूंपासून चिनी नौदलाने वाचविले भारतीय तेल टँकर | पुढारी

समुद्री लुटारूंपासून चिनी नौदलाने वाचविले भारतीय तेल टँकर

बीजिंग : पुढारी ऑनलाईन

लडाखमधील तणावाच्या परिस्थितीतही रस्ता हरवलेल्या व आजारी पडलेल्या चिनी नागरिकांना भारतीय जवानांनी वैद्यकीय उपचार, जेवण देऊन योग्य रस्ताही दाखविला होता. चीनकडूनही लडाखमधील तणाव दुर्लक्षून माणुसकीच्या नात्याने भारताला मदत झाली आहे. समुद्री लुटारू भारतीय तेल टँकर लुटण्याच्या तयारीत असताना त्यांना चिनी नौदलाने हुसकावून लावल्याची घटना घडली आहे.

एडनच्या समुद्रामध्ये ही घटना घडली. भारतीय तेल टँकरला सुखरूप भारताजवळ आणून सोडण्यात आले. या भारतीय तेल टँकरमध्ये 31 खलाशी होते. इजिप्‍तहून भारताकडेे हे जहाज निघाले होते. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ने याबाबत वृत्त दिले असून, भारतीय जहाजावर सेफ्टी कॅप्सूल होते. मात्र, कोणतेही सुरक्षा जवान नव्हते, असे त्यात म्हटले आहे. एडनची खाडी ही सर्वाधिक धोकादायक मानली जाते. या खाडीत सोमालियन चाचे लूटमार करतात. हे समुद्री चाचे जहाजाला लुटतात अथवा जहाज आणि कर्मचार्‍यांचे अपहरण करून खंडणी मागतात. भारतीय तेल टँकरने मदतीची मागणी करताच चिनी नौदलाने तातडीने धाव घेतली. चिनी नौदलाने भारताच्या समुद्री हद्दीपर्यंत या तेल टँकरला सुरक्षा दिली. भारतीय जहाजाच्या कॅप्टनने चिनी नौदलाचे अधिकारी यांग एईबिन यांचे आभार मानल्याचे ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे.

 

Back to top button