corona : नोकरी गेल्याने ४५० भारतीयांवर सौदीत भीक मागण्याची वेळ | पुढारी

corona : नोकरी गेल्याने ४५० भारतीयांवर सौदीत भीक मागण्याची वेळ

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोनामुळे जगभरात लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. सौदी अरेबियामध्ये नोकरीसाठी गेलेल्या ४५० भारतीयांना आपली नोकरी गमवावी  लागली. यामुळे त्यांना रस्त्यावर उभे राहून भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. दरम्यान, तिथल्या प्रशासनाने त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक लोकांचा कामाचा अवधी संपला आहे. परंतू दुसरे काम मिळत नसल्याने भीख मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्र राज्यातील लोकांचा यात समावेश आहे. या भारतीय कामगारांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, आमचा एकच गुन्हा म्हणजे आम्ही भीक मागतोय. या व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी सौदीच्या प्रशासनाने त्यांच्या खोल्यांची तपासणी केली आणि यानंतर त्यांची जेद्दाच्या शुमासी नजरकैद केंद्रात रवानगी केली आहे.

नजरकैदेत पाठविलेल्या कामगारांपैकी ३९ नागरिक उत्तर प्रदेशातील, बिहारमधील १०, तेलंगणाचे पाच, कर्नाटक चार व अन्य इतर ठिकाणचे आहेत. यातील कित्येक कामगार मनाने खचून गेले आहेत. यातील एका कामगाराने तक्रार केली आहे, आमच्याकडून कोणताही गुन्हा घडलेला नाही. आमच्याकडे नोकरी नसल्यामुळे आम्हाला भीक मागण्या शिवाय पर्याय नव्हता. या प्रशासनाने आम्हाला नजरकैदेत ठेवले आहे. यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत.

मागच्या चार महिन्यांहून अधिक काळ आम्ही अवस्थ आहे. पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका येथील कामगारांना त्यांच्या देशांच्या दुतावासांनी मदत केल्याचे पाहिले आणि त्यांना परत त्यांच्या देशात पाठविले आहे. पण आम्ही अजूनही इथे अडकलो आहोत.

या मजुरांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मजूर म्हणतो, माझा भावाचा मृत्यू झाला आणि माझी आई गंभीर आजारी आहे. मला भारतात परत यायचे आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी आणि सौदी अरेबियातील भारताचे राजदूत औसाफ सईद यांना पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे ४५० भारतीय कामगारांची दुर्दशा मांडली आहे. आम्हाला भारतात परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केंद्राला केली आहे.

 

Back to top button