बलात्कार करणार्‍याला नपुंसक करा : इम्रान खान | पुढारी

बलात्कार करणार्‍याला नपुंसक करा : इम्रान खान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था 

बलात्कार करणार्‍यांना जाहीरपणे फाशी दिली पाहिजे किंवा त्यांना नपुंसक केले पाहिजे, असे वक्‍तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, बलात्कारातील दोषींना नपुंसक करण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यास कुणी धजावू नये. लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपींचे एक रजिस्टर करणार आहे. त्यात सर्व माहिती नोंद केली जाईल. लैंगिक अत्याचारातील दोषींसाठी एक ग्रेडिंग सिस्टिम असली पाहिजे. असे घृणास्पद गुन्हे करणार्‍यांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे. 

पाकिस्तानात फ्रान्सच्या एका महिलेवर तिच्या मुलांसमोरच सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर जगरभरातून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक महिलांनी एकत्रित येत याविरोधात निदर्शने केली. दोषींना जाहीर फाशी देण्याच्या सूचनेला इम्रान खान यांनी पाठिंबा दिला आहे. 

ही महिला दोन मुलांसह गुरुवारी लाहोरहून गुजरावालकडे चालली होती. तिची कार बंद पडल्याने ते सर्व मदतीची वाट पाहत होते. यावेळी काहीजणांनी कारची काच फोडून त्या महिलेला जवळच्या शेतात फरफटत नेऊन बलात्कार केला. तिच्याकडील रोकड, एटीएम कार्ड, दागिनेही पळवले. पोलिसांनी या प्रकरणी 15 जणांना अटक केली आहे. 

Back to top button