नेपाळमधील जमीनही ‘ड्रॅगन’ने घातली घशात | पुढारी

नेपाळमधील जमीनही ‘ड्रॅगन’ने घातली घशात

काठमांडू : वृत्तसंस्था

नेपाळमधील ओली सरकारसोबत आपले संबंध घट्ट करताना चीन या देशातील भूभागावरही तितक्याच वेगाने कब्जा करीत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. नेपाळमधील हुमला भागात चीनने अनधिकृतरीत्या तब्बल 9 इमारती उभारल्याची माहिती समोर आली असून, स्थानिक सरकारी अधिकार्‍यांनीही याला दुजोरा दिला आहे.

नेपाळमधील ‘खबरहब’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, हुमलामधील सहायक मुख्य जिल्हा अधिकारी दलबहादूर हमाल यांनी स्थानिक मीडियामध्ये व्हायरल झालेल्या छायाचित्रांच्या आधारे 30 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान लापचा-लिपू क्षेत्राचा पाहणी दौरा केला. यावेळी चीनने उभारलेल्या 9 इमारती त्यांच्या निदर्शनास आल्या. या भागात चीनची प्रथम एकच इमारत असल्याची माहिती होती. मात्र, प्रत्यक्षात तेथे 8 आणखी इमारतींचे बांधकाम झाल्याचे समोर आले आहे.

हुमला : कायम दुर्लक्षित भाग

हुमला जिल्ह्यातील लापचा-लिपू भाग मुख्यालयापासून दूर असल्याने आतापर्यंत कायम दुर्लक्षित राहिला आहे. नेपाळ सरकारने या भागात कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. इतकेच काय, प्रशासकीय अधिकारीही या भागाचा दौरा कधी करीत नाहीत. नेमका याचाच फायदा चीनने उचलत आपला हेतू साध्य केला आहे.

नेपाळच्या गृह मंत्रालयाला कल्पना 

चीनने घुसखोरी करून उभारलेल्या बेकायदेशीर इमारतींची माहिती जिल्हा प्रशासनाने नेपाळच्या गृह मंत्रालयाला दिली आहे. दबाव वाढल्यानंतर यासंबंधी अहवाल गृह मंत्रालयाकडून परराष्ट्र मंत्रालयाकडेही पाठविण्यात आला असून, नेपाळ सरकार लवकरच चिनी अधिकार्‍यांकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे समजते.

Back to top button