पुलवामा हल्ल्याची कबूली देणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्याची आता कोलांटी उडी! | पुढारी

पुलवामा हल्ल्याची कबूली देणाऱ्या पाकिस्तानी मंत्र्याची आता कोलांटी उडी!

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपुरा परिसरात ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले होते. घटनेत आमचा हात नाही, असा दावा त्यावेळी पाकिस्तान सरकारने केला होता. 

आता मात्र भ्याड हल्ल्याची ही घटना पाकिस्तानचे मोठे यश, मोठे शौर्य असल्याची दर्पोक्‍ती पाकिस्तानी संसदेत करण्यात आली आहे. गोरीपुरा गावालगत झालेला हा हल्ला आमच्या जातीचे एक भव्य असे यश होते, असे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी भर संसदेत कबूल केले आहे.

या दाव्याने दहशतवादाची फॅक्टरीचा शिक्का अधिक प्रबळ झाल्याने फवाद यांनी आता कोलांटी उडी मारली आहे. त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.  पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की त्यांचा देश दहशतवादाला पाठिंबा देत नाही. पुलवामा हल्ल्याबाबतच्या त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पाकिस्तान कोणत्याही दहशतवादाला परवानगी देत ​​नाही, मला चुकीचे समजण्यात आले. 

फवाद चौधरी नॅशनल असेंब्लीमध्ये म्हणाले की, आम्ही हिंदुस्थानात घुसून मारले. आमच्या यशाचे नेतृत्व पुलवामा इम्रान खान यांनी केले. आम्ही सर्वजण या यशामध्ये सहभागी होतो. त्यांच्या या वादामुळे संसदेत झालेल्या गदारोळानंतर ते आपले विधान बदलताना दिसले. नंतर एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, आम्ही निष्पाप लोकांना मारून शौर्य दाखवत नाही. आम्ही दहशतवादाचा निषेध करतो.

Back to top button