शरद पवारांप्रमाणे जो बायडेन यांनाही आवरला नाही पावसात सभा घेण्याचा मोह! | पुढारी

शरद पवारांप्रमाणे जो बायडेन यांनाही आवरला नाही पावसात सभा घेण्याचा मोह!

फ्लोरिडा : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जोर आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसांत तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रचारचा हा शेवटचा टप्पा मानला जात आहे. दरम्यान डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या फ्लोरिडा येथील सभेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचे झाले असे की, फ्लोरिडा येथील सभेदरम्यान मोठा पाऊस आला. पण, बायडेन यांनी सभा न थांबवता ती तशीच चालू ठेवली. मागील वर्षी महाराष्ट्रातील निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातऱ्यातील सभा अशीच पावसात घेतली होती. ही सभा गाजली होती. या सभेमुळे महाराष्ट्र संत्तातर झाले असे मानले जाते, आता बायडेन यांच्या पावसातील सभेमुळे अमेरिकेतही सत्तांतर होते का? हे पाहिले पाहिजे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्यामध्ये मोठी रस्सीखेच सुरु आहे. अमेरिकेमधील निवडणुकीच्या प्रचारदरम्यान जो बायडेन यांनी मतदारांवर आपला चांगला प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळे ते ट्रम्प यांना चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान जो बायडेन हे फ्लोरिडा येथे सभा घेत असताना अचानक मोठा पाऊस आला. पण, जो बायडेन यांनी सभा न थांबवता तशीच चालू ठेवली. लोकांनीही ही सभा स्व:तच्या गाडीमध्ये बसून ऐकली. या पावसातील सभेची चांगलीच चर्चा सध्या अमेरिकेत सुरु झाली आहे.

दरम्यान, जो बायडेन यांनी पावसातील सभेचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘अशी अनेक वादळे निघून जातील आणि नवा दिवसचही उगवेल’ अशी कॅप्शन देऊन शेअर केला आहे. समाज माध्यमांवर या सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे बायडेन यांनी अमेरिकन मतदरांची मने जिंकल्याचे मानले जात आहे. या पावसातील चर्चा फक्त अमेरिकेतच नाही, तर ती महाराष्ट्रात देखील सुरु झाली आहे. कारण, मागील वर्षी शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली आणि निवडणुकीचे चित्रच पालटले होते. १९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील सभेला १ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अनेक नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ आठवण म्हणून पुन्हा समाज माध्यमांमध्ये व्हायरल केला होता. पावसातील सभेमुळे शरद पवार यांनी जे महाराष्ट्रात घडवलं तेच आता जो बायडेन अमेरिकेत घडवतात का? हे पहावे लागेल. 

Back to top button