अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचा नवा रुग्ण! | पुढारी

अमेरिकेत दर सेकंदाला कोरोनाचा नवा रुग्ण!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

जगभरातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4.54 कोटींवर गेला आहे. तीन कोटी 30 लाख 64 हजार 809 रुग्ण बरे झाले आहेत. आजअखेर कोरोनाने 11.88 लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’नुसार अमेरिकेत दर सेकंदाला एक नवा संक्रमित समोर येत आहे. 24 तासांचे 86 हजार 400 सेकंद होतात. एवढ्याच कालावधीत गुरुवारी 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. भारताच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. भारतात 24 तासांत 45 ते 50 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत.

शुक्रवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या पत्रकारत जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे की, महामारी सुरू झाल्यानंतर अमेरिकेत गुरुवारी आढळून आलेला रुग्णांचा आकडा हा आजवरचा सर्वांत मोठा आकडा आहे. गुरुवारी 91 हजार 530 नवे रुग्ण अमेरिकेत आढळले. मृतांची आजअखेर संख्या आता 2 लाख 28 हजार 626 झाली आहे. जगभरात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेतच आढळले आहेत आणि सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेतच झालेले आहेत. बुधवारी या देशात 88 हजार नवे संक्रमित आढळले होते.

तैवानमध्ये एकही रुग्ण नाही

चीनचा शेजारी देश असलेल्या तैवानमध्ये 12 एप्रिलनंतर एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. तैवानमध्ये आजवर 550 रुग्ण आढळले आहेत आणि 7 जणांचा मृत्यू कोरोनाने झालेला आहे. ऑस्ट्रेलियन मेडिकल सेंटरने न्यूझीलंड आणि तैवानचे कोरोना हाताळण्यासंदर्भात कौतुक केले आहे.

रशियामध्ये दुसरी लाट

रशियामध्ये गुरुवारी नवे 18 हजार रुग्ण आढळले. 366 जणांचा मृत्यू झाला. तथापि, 14 हजार रुग्ण या दरम्यान बरेही झाले आहेत. थंडी वाढत आहे, तसे रुग्णांचे प्रमाण वाढणार आहे, असा इशारा आरोग्य विभागाने इथे दिलेला आहे.

फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन

फ्रान्समध्ये महिनाभरासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सर्व रेस्टॉरंटस् आणि हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. 

Back to top button