अमेरिकेत मतदानानंतर हिंसाचार उसळण्याचे संकेत | पुढारी

अमेरिकेत मतदानानंतर हिंसाचार उसळण्याचे संकेत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे गांभीर्य पाहाता अमेरिकेत मतदानानंतर दंगली उसळण्याची शक्यता वर्तविली गेल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याआधीच्या कुठल्याही निवडणुकीदरम्यान असा बंदोबस्त अमेरिकेच्या इतिहासात कधीही नव्हता.

रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेट जो बिडेन समोरासमोर आहेत. निवडणूक कुणीही जिंको, मतदानानंतर दंगे भडकतीलच, असे शेकडो दावे समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्तात कसूर ठेवलेली नाही.

दुसरीकडे अमेरिकन नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षेची व्यवस्था स्वत:च करण्यावरही भर दिलेला आहे. लोकांनी आपापली घरे, दुकाने कव्हर केलेली आहेत. दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेल्या आंदोलनांच्या इशार्‍याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. ट्रम्पसमर्थकांनी बिडेन-हॅरिसची प्रचार बस अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न केला होता. ट्रम्प जर निवडणूक जिंकले नाहीत, तर देशात मोठा हिंसाचार भडकू शकतो, ही भीती प्रचंड आहे. 

डेमोक्रेट राज्यांत भीती जास्त

वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्को परिसरात ही भीती जरा जास्त आहे कारण येथे  डेमोक्रेटिक सत्ता आहे.  सुरुवातीला एक्झिट पोलमध्ये बिडेन ट्रम्पपेक्षा बरेच आघाडीवर होते. नंतर हे अंतर कमी कमी होत गेले. ‘रियल क्लियर पॉलिटिक्स’च्या हिशेबाने ट्रम्प यांच्या तुलनेत बिडेन यांना 6.7 टक्के आघाडी प्राप्‍त परिस्थितीत आहे.

व्हाईट हाऊसची तटबंदी

तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व महत्त्वपूर्ण सरकारी आस्थापना हाय अलर्टवर आहेत. गुप्‍तचर यंत्रणांनी व्हाईट हाऊस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाची तटबंदी एखाद्या अभेद्य किल्ल्याप्रमाणे करून ठेवलेली आहे. परिसराभोवती उंच भिंत उभी केली आहे. 

निवृत्त सैनिकही सक्रिय

डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूणच पवित्रा बघून निवृत्त सैनिकही संभाव्य हिंसा रोखण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत इतके भयाचे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. 

माफियांकडून गृहयुद्धाची धमकी

देशातील माफिया टोळ्यांनी गृहयुद्धाची धमकी वेगळी देऊन ठेवलेली आहे. कट्टर डावे हिंसेच्या तयारीत आहेत. तिकडे विविध शहरांचे महापौर, पोलिस प्रमुख लोकांना सुरक्षेबाबत आश्‍वस्त करत आहेत, पण लोक आश्‍वस्त नाहीत. बंदुकांच्या विक्रीचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे. 

बल में बल अपना बल!

स्वत:ची सुरक्षा स्वत:च करण्याकडे काहींचा कल धोकादायक आहे. नॅशनल गार्ड्स सर्वत्र तैनात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपने आपल्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या निवडणुकीवर आपला अहवाल जारी केला आहे. देशासमोर हिंसेचे संकट असल्याचे या समूहाने म्हटले आहे. होमलँड सिक्युरिटी विभागानेही आपल्या मासिक अहवालात हिंसाचाराची शक्यता वर्तविली आहे. 

ट्रम्प यांच्यावर 37 कोटींचा सट्टा

ब्रिटनमध्ये ट्रम्प यांच्या विजयावर एकेकाळच्या ब्रिटिश बँकरने 5 दशलक्ष डॉलरचा (जवळपास 37 कोटी रुपये) सट्टा लावला आहे. हा आजवरचा सर्वांत मोठा डाव मानला जातो आहे. आतापर्यंतच्या निवडणूक सर्वेक्षणांतून मात्र बिडेन यांनाच आघाडी आहे.

 

Back to top button