आता याला काय म्हणावं! ट्रम्प ज्युनिअरनं नकाशात काश्मीर दाखवला पाकिस्तानात | पुढारी

आता याला काय म्हणावं! ट्रम्प ज्युनिअरनं नकाशात काश्मीर दाखवला पाकिस्तानात

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर जगाचा नकाशा पोस्ट केला आहे. परंतु, हा नकाशा वादग्रस्त ठरला आहे. ट्रम्प ज्युनिअरने जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक देशांना जगाच्या नकाशावर लाल आणि निळ्या रंगात विभागून दर्शविले आहे. या नकाशामध्ये, भारत त्याच्या वडिलांचा प्रतिस्पर्धी उमेदवार बायडन यांचा समर्थक असल्याचे म्हटले जाते. ट्रम्प ज्युनिअरने नकाशामध्ये काश्मीर पाकिस्तानात असल्याचे दाखवले आहे. तसेच ईशान्य भारत भारताचा भाग नसल्याचे दाखवत लाल रंगात दर्शवले आहे.

डोनाल्ड ज्युनिअरने अमेरिकेत मतमोजणी सुरू असताना हा नकाशा ट्विट केला होता. यामध्ये ट्रम्प यांना पाठिंबा देणारे देश लाल रंगात तर बायडन यांचे समर्थक निळ्या रंगात दर्शविले गेले आहेत. 

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर ट्रम्प ज्युनिअरचा हा नकाशा ट्विट केला आहे. त्याचबरोबर, नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टीका केली जात आहे. शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “नमोची ब्रोमन्सची किंमत: काश्मीर आणि ईशान्य भारताचा भाग काढून टाकण्यात आला आहे…” 

ट्रम्प ज्युनिअरने ट्विटरवर हा नकाशा ट्विट केल्याने सोशल मीडिया युजर्सकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

 

Back to top button