अमेरिका निवडणूक : आम्ही जिंकत आहोत; बायडेन यांचा दावा | पुढारी

अमेरिका निवडणूक : आम्ही जिंकत आहोत; बायडेन यांचा दावा

वाशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची सलग दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या निकालानुसार डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी 264 इलेक्ट्रोल मते घेऊन आघाडी घेतली आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांची गाडी 214 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, जो बायडेन यांनी आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. 

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन 270 मतांच्या जादूई आकड्यांपासून अवघ्या काही पावलांनी मागे आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प बायडेन यांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. ते बहुमतापासून दूर आहेत. ट्रम्प सध्या पेनसिल्व्हेनिया, उत्तर कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. तथापि, बायडेन यांची उत्कृष्ट कामगिरी असूनही ट्रम्प अजूनही अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने तीन राज्यांतील मतमोजणीला कोर्टात आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या निकालातील उशीर लक्षात घेता आता निवडणूक अधिकाऱ्यांनी मोठ्या राज्यांतील मतमोजणीला वेग दिला आहे. अजून नेवाडा, जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि पेनसिल्व्हेनियामध्ये निकाल प्रलंबित आहेत. जर बायडेन यांनी नेवाडा जिंकले तर ते आवश्यक 270 आकड्यांपर्यंत पोहोचतील. अध्यक्ष ट्रम्प जर पेनसिल्व्हानिया, उत्तर कॅरोलिना, नेवाडा आणि जॉर्जियामध्ये विजयी झाले तर 270 पोहोचतील.

दुसरीकडे ट्रम्प यांच्या टीमसाठी वाईट बातमी अशी आहे की जो बायडेन यांची आघाडी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनियामध्ये खूप वेगाने पुढे जात आहेत, ज्यामुळे ट्रम्प यांची आघाडी कमी होत आहे. विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतदानासाठी अपील करणार असल्याचे ट्रम्प यांच्या टीमने सांगितले. पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगनमध्ये या राज्यांत अजूनही कोट्यवधी मतांची मोजणी व्हायची आहे. मते मोजण्यास अजून काही दिवस लागतील.

अजूनही मतमोजणी सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष कोण असतील या निर्णयाची अजूनही वाट पाहावी लागणार आहे. एका अहवालानुसार 9 राज्यांत अजूनही मतमोजणी सुरू आहे. अलास्कामध्ये केवळ 56 टक्के मते मोजली आहेत. याठिकाणी ट्रम्प आघाडीवर आहेत. या निकालाकडे जगाचे लक्ष लागले आहे. 

वाचा :अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत बेळगावच्या मराठमोळ्या उद्योजकाचा डंका

वाचा :पराभव दिसू लागताच डोनाल्ड ट्रम्प यांचा तीळपापड? मतमोजणी सुरु असतानाच घेतला मोठा निर्णय!

Back to top button