अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत बेळगावच्या मराठमोळ्या उद्योजकाचा डंका | पुढारी

अभिमानास्पद! अमेरिकेच्या निवडणुकीत बेळगावच्या मराठमोळ्या उद्योजकाचा डंका

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी झालेल्या निवडणुकीत मराठमोळ्या उमेदवाराने इतिहास रचला आहे. ‘डेमोक्रेटिक पक्षा’चे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी ९३ टक्के मतांसह विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले असतानाच मराठीजणांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर आली. आणि महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ६५ वर्षीय श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवला आहे. एकूण मतांपैकी ९३  टक्के मतदारांचा कौल मिळवत सहा विरोधकांचा पराभव केला. 

वैज्ञानिक असलेल्या श्री ठाणेदार यांचे उद्योग जगतातही मोठे नाव

श्री ठाणेदार हे मूळ बेळगावचे. रसायनशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २४ व्या वर्षी १९७९ मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले.

२०१८ मध्ये श्री ठाणेदार यांनी गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावले होते. ‘श्री फॉर व्ही’ हे त्यांचं कॅम्पेन टीव्हीवर गाजले होते.

यंदा ते पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. कोरोनाच्या काळातही त्यांनी सॅनिटायझर, मास्क यांचं वाटप करुन मिशिगनमधील जनतेला आधार दिला. गरिबी, गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

माझ्या यशामागे आईचे संस्कार असल्याची भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Back to top button