कायद्याचे काटे; बायडेन यांचा मार्गही खडतर... | पुढारी

कायद्याचे काटे; बायडेन यांचा मार्गही खडतर...

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

दर निवडणुकीत अमेरिकेमध्ये मतदानानंतर दुसर्‍याच दिवशी राष्ट्राध्यक्ष कोण होणार ते स्पष्ट झालेले असते. यावेळेला तीन दिवस उलटले तरीही चित्र धुसर आहे. डेमोक्रॅट उमेदवार जो बायडेन यांनी इलेक्टोरल मतांमध्ये 264 मतांची निर्णायक म्हणता येईल, अशी आघाडी घेतली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पारड्यात या क्षणापर्यंत 214 इलेक्टोरल मते आहेत. व्हाईट हाऊसचा दरवाजा त्यांच्यासाठी बंद होताना दिसतो आहे, म्हणून त्यांनी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कायद्याच्या काटेरी वाटांतून बायडेन यांचा मार्गही खडतर होऊन बसला आहे.

दुसरीकडे अनेक राज्यांतून ट्रम्प यांचेसमर्थक मतमोजणी केंद्रांच्या बाहेर गर्दी करून आहेत. मतमोजणीत गैरप्रकारांचा ठपका ठेवून निदर्शने करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प उत्तर कॅरोलिनात आघाडीवर आहेत; तर नेवाडा, अ‍ॅरिझोना आणि जॉर्जियातही आता बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. जॉर्जियानंतर सर्वांच्या नजरा पेन्सिल्वेनियावर खिळलेल्या आहेत. येथे 20 इलेक्टोरल मते आहेत. बायडेन जर येथे जिंकले तर ते 270 चा जादुई आकडा सहजगत्या पार करतील. जॉर्जियात याआधी 1992 मध्ये एकदाच केवळ डेमोक्रॅट उमेदवाराला विजय मिळू शकलेला आहे. बायडेन यांनी यावेळी जॉर्जिया जिंकले तर हा विजय ऐतिहासिक ठरणार आहे. खरे तर ट्रम्प जिंकतील, की बायडेन याबद्दल या क्षणाला काही अंदाज बांधणे घाईचे ठरेल. कारण हजारो मतांची मोजणी अजून बाकी आहे. बायडेन यांची घोडदौड वेगात आहे, एवढे नक्की. 

कुणाला किती मते?

‘फॉक्स न्यूज’नुसार जो बायडेन यांना एकूण 7 कोटी 34 लाख 88 हजार 248 मते मिळालेली आहेत. ट्रम्प यांना 6 कोटी 96 लाख 22 हजार 407 मते मिळाली आहेत. या हिशेबाने बायडेन यांना 50.5, तर ट्रम्प यांना 47.9 टक्के मते मिळालेली आहेत. 

दोन राज्यांत याचिका फेटाळल्या

दरम्यान, अमेरिकेतील न्यायालयांनी मिशिगन आणि जॉर्जियात ट्रम्प यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरुद्ध दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत.

ट्रम्प समर्थकांवर फेसबुकचे बॅन

फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या एका मोठ्या गटाला बॅन केले आहे. या समूहाने ‘स्टॉप द स्टील’ अभियान सुरू केले होते. हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा मजकूर यातून शेअर केला जात होता. ट्विटर आणि इन्स्टाग्रामनेही अनेक पोस्ट रोखल्या आहेत. 

टपाली मतांना न्यायालयात आव्हान

बहुतांश राज्यांत काट्याची लढत होती. काट्याची लढत असलेल्या ज्या-ज्या राज्यांत बायडेन यांनी आघाडी घेतली आहे, त्या-त्या प्रत्येक राज्यात मतमोजणी किवा टपालाने आलेल्या मतांना न्यायालयात आव्हान देण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सुरू झालेली आहे. न्यायालयीन खटल्यांच्या निकालांना वेळ लागणारच आणि यादरम्यान अनिश्चिततेची स्थितीही कायम राहील.

Back to top button