भारतीय अमेरिकनांचे राजकारणावर वर्चस्व | पुढारी | पुढारी

भारतीय अमेरिकनांचे राजकारणावर वर्चस्व | पुढारी

पुणे : अनिल टाकळकर  

बायडेन यांच्या विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की  कमला हॅरिस आता या महासत्तेच्या उपाध्यक्ष होत असून त्यामुळे अमेरिकेतील भारतीय अमेरिकनांचे येथील राजकारणातील वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे. या निवडणुकीत मूळ भारतीय वंशाचे 12 प्रतिनिधी सिनेट आणि प्रतिनिधी गृहावर निवडून आले आहेत. त्यामुळे उद्योग विशेषत: आयटी क्षेत्रात असणारे भारतीय सक्रिय राजकारणातही आता ठळकपणे दिसतील, अशी अपेक्षा आहे. एकूण मतदारांच्या संख्येत भारतीय अमेरिकन 1 टक्का असले तरी अटीतटीच्या लढती  ज्या स्विंग स्टेटसमध्ये झाला, तेथे त्याची संख्या लक्षणीय होती. त्यापैकी बहुसंख्यांची मते बायडेन-हॅरिस यांना मिळाली. 

या निकालात सुरुवातीला ट्रम्प यांची आघाडी दिसत होती, तथापि टपाली मतदान आणि 3 नोव्हेंबरच्या पूर्वी झालेले आगाऊ मतदान यामुळे त्यांना मागे टाकून बायडेन यांनी आघाडी घेतली. या मतदानात बहुसंख्यांनी आपली पसंती बायडेन यांना दिली. आधी अशा पद्धतीने मतदान करणार्‍यांची संख्या 10 कोटीहून अधिक होती. त्यामुळे मतमोजणीला विलंब लागला. त्याचे भांडवल ट्रम्प यांनी करून  या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी शंका उपस्थित  करून त्यची गुंतागुंत वाढविली आहे . ज्या पेनसिल्वानिया राज्यात बायडेन यांचा जन्म झाला, त्याच राज्यातील 20 इलेक्ट्रोल मतांनी त्यांना 270 या जादुई आकड्याच्या पार नेले. मिशिगन, विस्कॉन्सिन आणि पेनसिल्व्हानिया ही जी 3 स्विंग राज्ये 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी जिंकून घेतली होती. ती अखेरच्या फेरीत बायडेन यांनी जिंकली. रिपब्लिकन बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणार्‍या अरिझोना आणि जॉर्जिया यातही बायडेन आघाडीवर आहेत.  पूर्णपणे दुभंगलेल्या अमेरिकेला एकसंध क रण्याचे, कोरोना आटोक्यात आणून  अर्थव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे, भारत आणि अमेरिका यांचे संबंध  बायडेन आले तरी मैत्रीपूर्ण राहणार आहेत. कारण ती अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांची गरज आहे.

Back to top button