अमेरिकेच्या जखमांवर ऐक्याचे मलम | पुढारी | पुढारी

अमेरिकेच्या जखमांवर ऐक्याचे मलम | पुढारी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेतील जनतेने मला स्पष्ट जनादेश दिलेला आहे. तब्बल 7.4 कोटी लोकांचे उच्चांकी मतदान डेमोक्रॅटस्ला झाले. हा केवळ माझा वा डेमोक्रॅटस्चा विजय नाही, तर हा अमेरिकेचाच नैतिक विजय आहे. लक्षपूर्वक ऐका… आज अमेरिका बोलते आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून मी कुठल्याही आधारावर देशातील लोकांमध्ये फूट पाडणार नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून मी हा बहुरंगी मण्यांचा देश एका धाग्यात ओवून दाखवेन! अशा भावगर्भ शब्दांत जो बायडेन यांनी आपल्या आगामी कारकिर्दीची रूपरेषा स्पष्ट केली. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी ते विल्मिंग्टन येथे विजयी सभेत बोलत होते.

ते म्हणाले, आम्ही जगातील सर्वात जुन्या लोकशाहीमध्ये वैविध्य पाहिले. या वैविध्याच्या बळावरच आम्ही जिंकलो आहोत. डेमोक्रॅटस्, रिपब्लिकन्स, अपक्ष, प्रोग्रेसिव्ह (प्रगतीवादी), कन्झर्व्हेटिव्ह (परंपरावादी), युवक, ज्येष्ठ, ग्रामीण, शहरी, लॅटिन, श्‍वेत, कृष्णवर्णीय, आशियन, होमो, लेस्बियन, ट्रान्सजेंडर अशा एक ना अनेक समाजघटकांचा पाठिंबा आम्हाला मिळाला.

जखमांवर फुंकर घालणार

पवित्र बायबलचा दाखला देत ते म्हणाले की, हा ग्रंथ आम्हाला सांगतो की, प्रत्येक कृतीची एक वेळ असते. विविध समाजघटकांमध्ये केवळ द्वेषाच्या पेरणीमुळे आपापसात वेगळेपणाच्या ज्या जखमा झाल्या आहेत त्यावर मलम लावण्याची, फुंकर घालण्याची वेळ (बायडेन यांच्या विजयाच्या रूपात) आता आली आहे.  

धावतच व्यासपीठावर

जो बायडेन (वय 77) अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले असले, तरी तूर्त ते ‘प्रेसिडेंट इलेक्ट’ आहेत. येत्या 20 जानेवारी रोजी शपथग्रहणानंतर ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनतील. आपल्या पहिल्यावहिल्या भाषणातून त्यांनी कटुता दूर करणे, देशाचे ऐक्य, सर्वांचा राष्ट्राध्यक्ष अशा विषयांवर भर दिला. तत्पूर्वी, व्यासपीठाकडे जाताना ते चालत नव्हे तर धावतच पोहोचले. निवडणूक प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन हे वृद्ध असून, थकलेले असल्याची टीका केली होती. बायडेन यांची विजयानंतर व्यासपीठापर्यंतची ही धाव ट्रम्प यांच्या आरोपाला दुसरे उत्तर होते! याआधीही एका प्रचारसभेदरम्यान पाऊस सुरू झाला तेव्हा भरपावसात बायडेन यांनी अखेरच्या शब्दापर्यंत भिजत भिजतच भाषण केले होते!

ट्रम्प आणि समर्थकांना उद्देशून…

ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना उद्देशून बायडेन म्हणाले, मला ठाऊक आहे. ज्यांनी ट्रम्पना मते दिली ते आज निराश असतील; पण लक्षात घ्या मीही यापूर्वी अनेकदा ही निवडणूक हरलेलो आहे. लोकशाहीचे हेच व्यवच्छेदक सौंदर्य आहे की, इथे पराभव वा विजय अंतिम नसतो. इथे सर्वांना संधी मिळते. म्हणून राग गिळून टाका. द्वेष संपवून टाका. विरोधकांना शत्रू समजणे बंद करा… हे लक्षात ठेवा की, शेवटी आम्ही सारेच अमेरिकन आहोत.

बलिदान द्यावे लागते : कमला हॅरिस

‘व्हाईस प्रेसिडेंट इलेक्ट’ (नियोजित उपराष्ट्राध्यक्षा) कमला हॅरिस यांचेही भाषण यावेळी झाले. त्या म्हणाल्या, लोकशाहीची कुठलीही शाश्‍वती अशी नसते. ती टिकवून ठेवण्यासाठी आपण किती कष्ट घेतो, यावर तिचे अस्तित्व अवलंबून असते. लोकशाहीसाठी बलिदान द्यावे लागते. आम्ही हेच केले. करतो आहोत. यावेळेच्या मतदानात लोकशाही पणाला लागली होती. आपण सर्वांनी मिळून अमेरिकेत एक नवी पहाट उगविलेली आहे. हा विजय म्हणजे समता आणि न्यायासाठी 4 वर्षे चाललेल्या लढ्याला आलेले यश आहे.

सासूला दिलेला शब्द पाळला

बायडेन यांचे पहिले लग्‍न 1966 मध्ये झाले होते. तेव्हा ते 24 वर्षांचे होते. लग्‍नापूर्वी मुलीच्या आईने त्यांना काय करतोस म्हणून विचारणा केली होती, त्यावर एक दिवस मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार आहे, असे बायडेन यांचे उत्तर होते. बत्तीस वर्षांच्या राजकारणात तिसर्‍या प्रयत्नात ते अखेर 77 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेच!

Back to top button