ज्यो बायडेन यांच्यामुळे पाच लाख भारतीयांना 'लॉटरी' लागणार? | पुढारी

ज्यो बायडेन यांच्यामुळे पाच लाख भारतीयांना 'लॉटरी' लागणार?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सुमारे 5 लाख भारतीयांसह पुरेशी व आवश्यक कागदपत्रे नसलेल्या 1 कोटी 10 लाख अप्रवासी अमेरिकनांना अमेरिकन नागरिकत्व बहाल करण्याची शक्यता आहे. याचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. तो लवकरच कागदावर उतरवला जाईल, असे सांगण्यात येते.

या सर्वांना अमेरिकेचे नागरिकत्व दिले जाईल. शिवाय, दरवर्षी किमान 95 हजार शरणार्थ्यांना अमेरिकेत आश्रय दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती नियमावली तयार केली जाईल तसेच यंत्रणाही उभारली जाणार आहे. बायडेन यांच्या प्रचारमोहिमेची जबाबदारी असलेल्या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या धोरणात्मक परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, बायडेन लवकरच संसदेत इमिग्रेशन सुधारणा विधेयक पारित करवून घेणार आहेत. त्यानुसार दरवर्षी अमेरिकेत 1 लाख 25 हजार शरणार्थ्यांना प्रवेश देण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले जाईल. शिवाय, शपथग्रहणानंतर लगेचच किमान 95 हजार शरणार्थ्यांना दरवर्षी आश्रय देणारा कायदा मंजूर करवून घेतला जाईल.

मुस्लिमांवरील बंदी उठविणार

बायडेन यांच्या या परिपत्रकात म्हटले आहे की, एखाद्या समाजघटकावर त्याच्या धर्मामुळे बंदी आणणे, हे मानव म्हणून अन्याय्य आहे. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मुस्लिमांवरील बंदी’च्या निर्णयाला रद्द ठरवले जाईल. ट्रम्प यांनी 2017 मध्ये इराण आणि सीरियासह 7 मुस्लिम देशांतील नागरिकांच्या अमेरिकेतील आगमनावर बंदी घातली होती. बायडेन हा निर्णय रद्द ठरवणार आहेत, असेही या परिपत्रकात सूचित केले आहे. निवडणुकीत बायडेन यांना अमेरिकन-मुस्लिमांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला होता, हे येथे उल्लेखनीय!

Back to top button