चीनविरुद्ध भारताच्या बाजूने नसतील जो बायडेन! | पुढारी

चीनविरुद्ध भारताच्या बाजूने नसतील जो बायडेन!

कोल्हापूर : पुढारी डेस्क

सर्वात जवळचे संबंध असलेले जगातील दोन देश कोणते तर ते भारत आणि अमेरिकाच असावेत, हे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन जो बायडेन यांनी सन 2006 मध्ये केले होते. बायडेन हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेवरील भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीला त्यांनी (बायडेन यांनी) अधिकृतपणे पाठिंबा दिला होता. आताही राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येताच आवश्यक कागदपत्रांच्या अभावाने रखडलेल्या 5 लाख भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व देण्याचा विषय त्यांनी ऐरणीवर घेतला आहे; पण चीनच्या विस्तारवादाविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प ज्याप्रमाणे भारताच्या बाजूने उघड भूमिका घेत, तसे बायडेन करणार नाहीत.

बायडेन यांच्याच डेमोक्रॅटस् पक्षाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने भारतासमवेतचे संबंध द‍ृढ केले होते. त्याच गतीने त्यांच्यानंतर निवडून आलेले रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतासोबतचे संबंध आणखी पुढे नेले. तज्ज्ञांच्या मते, 2000 नंतर अमेरिकेच्या भारताबद्दलच्या द‍ृष्टिकोनात फार फरक पडलेला नाही. मग, अमेरिकेत वा भारतातही सत्तेत कुणी का असेना. बिल क्लिटंन, जॉर्ज बुश, ओबामा आणि ट्रम्प यांनी भारताशी संबंध चांगलेच ठेवले.

बायडेन यांच्या गोटात चीनबाबतचा विचार जरा वेगळा असल्याने भारतासोबत असलेल्या अमेरिकेच्या संबंधांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, ओबामा-बायडेन सरकारनेच संरक्षणाच्या क्षेत्रात भारत हा मोठा भागीदार असल्याचे रीतसर जाहीर केले होते, हेही विसरून चालणार नाही. चीनच्या विषयावर ट्रम्प जितके उघडपणे भारताच्या बाजूने होते, तितके बहुदा बायडेन असणार नाहीत, एवढेच!

प्रातिनिधिक स्वरूपात हे चार मुद्दे

* दहशतवादाविरुद्ध बायडेनही असतीलच; पण पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर ते प्रचारादरम्यान काही बोललेले नाहीत. पुढे याबाबत त्यांची भूमिका काय असेल, याबाबत भारत साशंक आहे. 

* चीनच्या विस्तारवादावरही बायडेन ट्रम्प यांच्याप्रमाणे चीनविरुद्ध आक्रमक नसतील; पण आंतरराष्ट्रीय नियमांबरहुकूम हिंदी-प्रशांत क्षेत्रातील स्थैर्याबाबत ते भूमिका घेतील, अशी भारताल आशा आहे.

* एच 1 बी- व्हिसाबाबत ट्रम्प प्रशासन कडक होते. अमेरिकेत शिक्षण, कामधंदा, रहिवास ही स्वप्ने बघणार्‍या भारतीय तरुणाईसाठी ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन हे खुल्या मनाचे सिद्ध होतील, याबाबत शंका नाही.

* मानवाधिकाराचा मुद्दा करून विशेषत: उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस काश्मीरमधील 370 कलमाबाबत भारताविरुद्ध भूमिका घेतील. नागरिकत्व कायद्यावरही त्या टीका करतील, अशीच शक्यता अधिक आहे.

Back to top button