जो बायडेन यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत शुभेच्छा  | पुढारी

जो बायडेन यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत शुभेच्छा 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 

जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले असले तरी डोनाल्ड ट्रम्प अद्याप त्यांचा पराभव मानायला तयार नाहीत. त्यामुळे दुसर्‍या देशांनी नवनिर्वाचित अध्यक्ष बायडेन यांना जे शुभेच्छा संदेश पाठवले आहेत, ते बायडेन यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे काही परदेशी नेते थेट बायडेन यांच्याशी संपर्क साधून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. 

नियम आणि परंपरेनुसार व्हाईट हाऊसमधील स्टेट डिपार्टमेट अशा शुभेच्छा संदेशांना प्रेसिडेंट इलेक्ट यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. मात्र ट्रम्प यांच्या  हट्टापुढे  सध्या अमेरिकेचा परराष्ट्र विभागच अगतिक झाला आहे. नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन हे 20 जानेवारी रोजी शपथ घेणार आहेत. त्याला अद्याप बराच अवकाश आहे. 

व्हाईट हाऊसच्या स्टेट डिपार्टमेंटकडे अनेक देशांच्या नेत्यांचे शुभेच्छा संदेश आले आहेत. पण ट्रम्प यांच्या इशार्‍यामुळे ते बायडेन यांना कळवले जात नाहीत. त्यामुळे बायडेन यांची टीमच आता परदेशी नेत्यांना थेट संपर्क करत आहे. बायडेन आणि कमला हॅरिस डेलावेयर येथील कार्यालयातून फोनवरून  परदेशी नेत्यांशी चर्चा करत आहेत. बायडेन यांना गुप्तचर यंत्रणेकडून मिळणारी माहितीही दिली जात नाही. ही देखील परंपरेनुसार घडणारी गोष्ट आहे. मात्र, सध्या ती होत नाही. व्हाईट हाऊसमधील या परिस्थितीमुळे येथील डिप्लोमॅट्सही त्रासले आहेत.  एरवी अमेरिकेत नेहमीच सत्तेचे हस्तांतरण शांतपणे झालेले आहे. स्टेट डिपार्टमेंटचा वापर करणे हा बायडेन यांचा अधिकार आहे; पण ट्रम्प त्यांच्या मार्गात आडकाठी आणत आहेत.

Back to top button