‘फायझर’ची लस ९५ टक्के प्रभावी  | पुढारी

‘फायझर’ची लस ९५ टक्के प्रभावी 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

फायझर या अमेरिकी औषध कंपनीने कोरोनाला रोखण्यासाठी विकसित केलेली लस अंतिम विश्‍लेषणात 95 टक्के प्रभावी आढळली असल्याचा दावा करताना काही दिवसांतच आवश्यक मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे अर्ज केला जाणार असल्याची माहिती बुधवारी दिली.

आमच्या कंपनीच्या लसीचे विश्‍लेषण केले असता, ही लस कोविड-19 रोखण्यात 90 टक्के परिणामकारक होऊ शकते, असे फायझर कंपनीने अंतिम विश्‍लेषणाच्या काही दिवस आधी म्हटले होते. यावरून लसीसंदर्भात कंपनीची चाचणी योग्य पद्धतीने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या लसीवरून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही कंपनीचे अभिनंदन केले होते. 

लसीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि अन्य पाच देशांतील सुमारे 44 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले. फायझर आणि जर्मनीतील त्यांची सहाय्यक कंपनी बायोएन्टेकही कोविड-19पासून संरक्षणासाठी लस तयार करण्याच्या शर्यतीत आहे. अन्य एक अमेरिकी कंपनी मॉडर्नानेही या महिन्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. 

फायझरची लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकी सरकारला दर महिन्याला फायझरने विकसित केलेली जवळपास दोन कोटी लसीचे डोस उपलब्ध होतील. अमेरिकन सरकार आणि फायझर यांच्यात लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार झाला असून 50 लाख नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार असल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट केले होते. लसीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेले वृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आणि एप्रिल महिन्यापर्यंत सर्व नागरिकांसाठी लस उपलबध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Back to top button