हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास! | पुढारी | पुढारी

हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास! | पुढारी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने कुख्यात दहशतवादी, जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या तसेच 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला अवैध टेरर फंडिंग प्रकरणात (दहशतवाद्यांना पैसा पुरविणे) 10 वर्षांचा कारावास सुनावला आहे. 

पाकिस्तानी माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली. हाफिज सईद याला गतवर्षी 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. हाफिज हा मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. मुंबई हल्ल्यात 166 लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले होते.

सईद याचे आणखी दोन साथीदार जफर इक्बाल आणि याह्या मुजाहिद यांना दोन प्रकरणांत प्रत्येकी पाच वर्षे आणि आणखी एका प्रकरणात प्रत्येकी सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. दोघांना प्रत्येकी 1 लाख 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्व दोषींची स्थावर-जंगम मिळकत जप्त करण्यात आली आहे.

सईदविरुद्ध 41 गुन्हे

फेब्रुवारी महिन्यातही हाफिज सईद याला लाहोर येथील न्यायालयाने टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणांत तो दोषी असल्याचा निकाल देत 5 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. सईदविरुद्ध टेरर फंडिंग, मनी लाँडरिंग आणि अवैध ताब्याचे41 गुन्हे दाखल आहेत. हाफिज सईद लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक असून, 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी जाहीर केले होते. 2002 मध्ये पाकिस्तान सरकारनेही ‘लष्कर’वर बंदी घातली होती. नंतर हाफिज सईदने जमात-उद-दावाची स्थापना केली.

 

Back to top button