चीनच्या आण्विक पाणबुड्यांची समुद्रात टेहळणी | पुढारी

चीनच्या आण्विक पाणबुड्यांची समुद्रात टेहळणी

बीजिंग/वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

आपल्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे सगळ्या जगात बदनाम असलेला चीन आता समुद्रात नवी खेळी करत आहे. चीनच्या बलाढ्य आण्विक पाणबुड्या गोपनीय पद्धतीने दक्षिण चिनी समुद्र, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरात टेहळणी करत आहेत. या पाणबुड्या पाण्याखाली इतक्या गुपचूप टेहळणी करत आहेत की, त्यांचा त्या क्षणालाच ठावठिकाणा लावणे अमेरिकेसाठीही आव्हान ठरते आहे. अर्थात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियातील नौसेना मिळून समुद्रातील चिनी पाणबुड्यांचा वेध घेत आहेत. चारही देशांतील नौसेना अत्यंत गोपनीय माहितीही एकमेकांना सांगत आहेत.

चीनच्या या अद्ययावत पाणबुड्या ‘टाईप 093’ या नावाने ओळखल्या जातात. आण्विक ऊर्जेवर चालणार्‍या या पाणबुड्या ‘चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशनने तयार केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या वायजे-18 सुपरसोनिक क्रूझ मिसाईलसह नजीकच्या पल्ल्याच्या सीजे-1500 क्रूझ मिसाईलसह या पाणबुड्या सज्ज आहेत. आण्विक ऊर्जेवर त्या चालत असल्याने महिनोन् महिने त्या गोपनीय पद्धतीने मोहिमा राबवू शकण्यास समर्थ आहेत. वायजे-18 सुपरसोनिक क्रूझ मिसाईल 540 किलोमीटरपर्यंत तर  सीजे-1500 हे मिसाईल 10 किलोमीटरपर्यंत कुठल्याही हवाई लक्ष्याचा वेध घेऊ शकते, ही चीनच्या विरोधातील सर्व देशांची मुख्य चिंता आहे. एवढेच नव्हे तर चीनच्या या पाणबुड्या समुद्रात शत्रूची युद्धनौका वा कुठलीही नौका भेदू शकतात. नजीकच्या जमिनीवरील ठिकाणांचाही वेध घेऊ शकतात.

पाकिस्तान, फिलिपाईन्स, इंडोनेशिया या आशियातील अमेरिकेच्या पारंपरिक मित्रांनाही चीन आपल्या बाजूने ओढण्यात यशस्वी ठरला आहे. दुसरीकडे तैवान आणि भारतासह चीनचे वाद उफाळलेल्या स्थितीत असल्याने हे देश अमेरिकेच्या नव्या मित्रांच्या यादीत आलेले आहेत.

Back to top button