‘अ‍ॅस्ट्राझेनेका’कडून अमेरिकेतील उत्पादन प्रक्रियेत चूक  | पुढारी

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’कडून अमेरिकेतील उत्पादन प्रक्रियेत चूक 

बीजिंग/वॉशिंग्टन/अहमदाबाद : वृत्तसंस्था

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 6 कोटींवर गेली आहे. लसीच्या कामालाही वेग आलेला आहे. भारतासह अमेरिकेनेही लसीच्या वितरणाची योजना आखण्याच्या कार्याला गती दिलेली आहे. लसीला मान्यता मिळताच ती अधिकाधिक लोकांपर्यंत देण्याचा सर्वच देशांचा प्रयत्न असेल. चायना नॅशनल बायोटेक या लस उत्पादक कंपनीने आरोग्य नियामक मंडळाकडे लस बाजारात आणण्यासाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे, ऑक्सफर्डची लस उत्पादित करणार्‍या अमेरिकेतील अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने उत्पादन प्रक्रियेदरम्यान एक चूक झाल्याची कबुली दिली आहे, तर भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्सिन’ची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी अहमदाबादेत सुरू झाली आहे.

अहमदाबादेतील सोला शासकीय रुग्णालयात स्वयंसेवकांना लस देण्यात आली. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत देशभरातील शंभरावर केंद्रांतून 25 हजार 800 स्वयंसेवकांना लस देण्यात येणार आहे.

संपूर्ण डोसची परिणामकारकता 62 टक्के; ज्येष्ठांवर डोस निष्प्रभ ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनेकातर्फे विकसित लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचे परिणाम आश्वस्त करणारे असले, तरी अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने लसीच्या उत्पादन प्रक्रियेत एक दोष उद्भवला होता, अशी जाहीर कबुली दिली आहे. काही स्वयंसेवकांना निम्मा डोस देण्यात आला होता, तर काहींना संपूर्ण डोस देण्यात आला होता. ज्यांना निम्मा डोस दिला त्यांच्यात लसीची 90 टक्के परिणामकारकता दिसून आली. ज्यांना संपूर्ण डोस दिला त्यांच्यात 62 टक्के परिणामकारकता दिसून आली. त्यामागची कारणे मात्र कंपनीने स्पष्ट केलेली नाहीत. अमेरिकेतील सूत्रांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांवर डोसचा फारसा परिणाम झालेला नाही. 

चिनी कंपनीने मध्य पूर्व देशांसह दक्षिण अमेरिकेत घेतलेल्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीचे परिणाम नियामकांकडे केलेल्या वितरणासाठीच्या अर्जासोबत जोडलेले आहेत. परिणाम काय होते, त्याबद्दलची माहिती मात्र चिनी कंपनीने अद्याप सार्वजनिक केलेली नाही. हे येथे उल्लेखनीय. अ‍ॅस्ट्राझेनेकासह फायझर या कंपनीची लसही मान्यता प्राप्त होण्याच्या टप्प्यात आहे. रशियानंतर सामान्य लोकांसाठी डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविणारी पहिली विकसक कंपनी म्हणून चीनमधील सीएनबीजी समोर आली आहे. आपत्कालीन वापरासाठी चीनमध्ये या कंपनीच्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील फायझर इंक कंपनीने ब्राझीलमध्ये आपली लस नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फायझरने जर्मनीसह ‘बी1टी162बी2’ ही लस विकसित केली आहे.

अहमदाबादेत 1000 जणांना देणार डोस

अहमदाबादेत 1000 लोकांना ‘कोव्हॅक्सिन’चे डोस देण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत चाचणी झाली. दहाजणांना डोस देण्यात आले. लस रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील शीतगृहात ठेवण्यात आली आहे.

Back to top button