‘ऑक्सफर्ड’ची लस भारताला २२२ रुपयांत | पुढारी

‘ऑक्सफर्ड’ची लस भारताला २२२ रुपयांत

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

कोरोना रोखण्यासाठी लसी बनवत असलेल्या कंपन्यांकडून एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या हाती येत आहेत. ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझेनेका/सिरमची ‘कोव्हिशिल्ड’ ही लस मोठ्या प्रमाणावरील मानवी चाचणीत 70 टक्के, तर कंपनीच्या दाव्यानुसार 90 टक्के यशस्वी असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी या लसीच्या परिणामकारकतेचे मुक्‍त कंठाने कौतुक केले आहे. 

लस प्राधान्याने भारतामध्ये वितरित करणे हेच आमचे मुख्य लक्ष्य असल्याने हीच लस भारतामध्ये उत्पादित करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेत विकसित होत असलेल्या ‘फायझर’ आणि ‘मॉडर्ना’च्या लसींपेक्षा आमच्या ‘स्पुत्निक व्ही’ लसीचा दर कमी असेल, असे रशियाने स्पष्ट केले आहे. ‘फायझर’च्या दोन डोसची किंमत 2,900 रुपयांपर्यंत असू शकते. ‘मॉडर्ना’चे दोन डोस 3,700 ते 5,400 रुपयांदरम्यान पडतील. ‘स्पुत्निक व्ही’चा दर अद्याप जाहीर व्हायचा आहे. ‘स्पुत्निक व्ही’ची परिणामकारकता 95 टक्के असल्याचे रशियाकडून जाहीर करण्यात आले आहे.

‘ऑक्सफर्ड’ लसीचे यश मोलाचे 

‘कोव्हिशिल्ड’चा भारतासह संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल. लसीचा पुरवठा करणे भारतात कठीण जाणार नाही. लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठविली जाऊ शकते. भारतातील विद्यमान शीतकरण व्यवस्था बघता आपल्या देशात या लसीच्या वितरणाला काहीही अडचण येणार नाही. ‘फायझर’ची लस उणे 70 अंश सेल्सिअसवर साठवावी लागणार आहे. भारतात ही लस मागवायची, तर आधी आपल्याला शीतकरण यंत्रणा अद्ययावत करावी लागेल. ‘कोव्हिशिल्ड’चे मात्र 40 कोटी डोस मार्चपर्यंत वितरणासाठी तयार असतील.

भारतात 5 लसींच्या चाचण्या 

   भारतात सध्या 5 लसींच्या चाचण्या सुरू आहेत. ‘सिरम’तर्फे ‘कोव्हिशिल्ड’ (ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्राझेनेका) लसीच्या चाचण्या सुरू आहेत. 

    भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सिन’ची तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू आहे. 

    ‘कॅडिला हेल्थ’च्या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. 

    ‘डॉ. रेड्डीज् लॅब्स’ने रशियन लस ‘स्पुत्निक व्ही’च्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी मंजुरी प्राप्‍त केली आहे. 

    हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल ए’ची उमेदवार लसही टप्पा 1 व 2 च्या प्रतीक्षा यादीत आहे. 

 

Back to top button