आयओसी संघटनेत पाक पुन्हा तोंडघशी  | पुढारी

आयओसी संघटनेत पाक पुन्हा तोंडघशी 

नियामे (नायजर) : वृत्तसंस्था 

काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा अपप्रचार पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. आफ्रिका खंडातील नायझर देशात राजधानी नियामे येथे झालेल्या ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (आयओसी) संघटनेची बैठक झाली. या बैठकीतील अजेंड्यावर काश्मीरचा मुद्दा समाविष्ट करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरले. इस्लामोफोबियाचा गवगवा करून भारताला घेरण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. 

काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न पाक पंतप्रधान इम्रान खान करतात. 57 मुस्लीम देशांची संघटना असलेल्या आयओसीच्या बैठकीत त्यासाठीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी आले होते. त्यांनी कलम 370 च्या मुद्द्यावर भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, संघटनेने या मुद्द्याचा समावेश बैठकीच्या अजेंड्यात करण्यास नकार दिला. त्यामुळे कुरेशी यांनी इस्लामोफोबिया मुद्दा काढला. त्यासाठी त्यांनी चुकीची तथ्ये समोर मांडली. मात्र, त्यांची ही खेळीही सफल होऊ शकली नाही. संघटनेने दहशतवादाविरोधात एकजूटता, शांतता आणि विकास अशी थीम ठेवली आहे. संघटनेचे सरचिटणीस युसूफ अल ओथेइमिन यांनी कुरेशी यांना मुस्लीम देशांच्या सामूहिक मुद्द्यांवर विचार करण्यासाठी बोलावल्याचे स्पष्ट केले.

सौदी अरेबियाचा भारताला पाठिंबा?

पाकिस्तानच्या ’द डॉन‘ या वृत्तपत्रातील माहितीनुसार या संघटनेतील सर्वात शक्तिशाली देश सौदी अरेबिया नकाराधिकाराचा खेळ खेळत आहे. सध्याच्या काळात सौदी आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत.

Back to top button