पुढारी ऑनलाईन डेस्क
२०१७ पासून जागतिक श्रीमंत व्यक्ती म्हणून बहुमान टिकवून असणाऱ्या अमेरिकेच्या अमेझॉन कंपनीचे सर्वेसर्वा जेफ बेजोस यांना मागे टाकत, एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्ला व स्पेसएक्स यासारख्या इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या कंपन्यांचे एलन मस्क हे संस्थापक आहेत.
मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स काल (गुरूवार) ४.८ टक्क्यांनी वाढल्याने त्यांनी जेफ बेजोस यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान पटकावला आहे. ब्लूमबर्गने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालात सर्वाधीक श्रीमंत ५०० व्यक्तींच्या यादीत एलन मस्क प्रथमस्थानी विराजमान झाले आहेत. कालच्या दिवशी मस्क यांची एकूण संपत्ती १८८.५ अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली. तर जेफ बेजोस यांची संपत्ती १८७ अब्ज डॉलर इतकी आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या अग्रणी अमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस यांचे जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान डळमळीत झाले होते. एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षभरात १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली असल्याचे एका निरीक्षणातून दिसून आले आहे. मस्क यांची टेस्ला कंपनी सध्या प्रचंड फायद्यात असून या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये ७४३ टक्के इतकी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग ही आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक श्रीमंत व्यक्तींची रोज यादी अद्यावत करत असते.