हिटलर करत होता पाच दिवस आत्महत्येची तयारी | पुढारी

हिटलर करत होता पाच दिवस आत्महत्येची तयारी

पुढारी ऑनलाईन डेस्क

संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटणाऱ्या हिटलरने शेवटी आत्महत्या केली हे जगाला माहीत आहे. पण त्याचे शेवटचे पाच दिवस अतिशय विषण्ण अवस्थेत गेले. तो मृत्यूची तयारी करत होता. जगावर ताबा मिळविण्याची मनीषा ठेवणारा हा हुकूमशहा अखेरच्या काळात प्रचंड निराश आणि कोरडा झाला होता. सर्वांनी आपल्याला फसवले अशी त्याची भावना झाली होती. त्यातूनच त्याने गोळी मारून आत्महत्या केली. इव्हा ब्राऊन या आपल्या प्रेयसीशी अखेरच्या क्षणी त्याने लग्न केले. मात्र, हे लग्न अधीकृत होण्याठी आवश्यक असलेल्या सर्टिफिकेटवर तारीख चुकली होती.

५० फुटांचे बंकर

सोव्हियत सैन्यांनी जर्मनीला पूर्णपणे घेरल्यानंतर हिटलर आपल्या घराच्या खाली ५० फुटांवर बनविण्यात आलेल्या बंकरमध्ये लपला होता. त्या परिसरात चॅन्सलरी बाग होती. त्या बागेभोवतीचा सगळा परिसर बॉम्ब हल्ल्यांनी उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची स्वीय सहायक त्राउदी जुंगा, एक अंगरक्षक आणि प्रेयसी इव्हा ब्राऊन होती. एप्रिलच्या २५ तारखेला त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याने अंगरक्षक हिंज लिंगे याला बोलावून घेतले आणि आपल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे सांगितले. ‘मी गोळी मारली की तू माझे मृत शरीर चॅन्सलरी बागेत घेऊन जा आणि आग लावून टाक. माझ्या मृत्यूनंतर कोणी मला ना मला पाहिलं पाहिजे, ना माझी ओळख पटली पाहिजे. नंतर तू माझ्या खोलीत परत जा, माझा गणवेश, माझे कागद आणि मी वापरलेली प्रत्येक गोष्ट जाळून टाक. केवळ माझ्या तैलचित्राला हात लावू नको. ते चित्र माझा ड्रायव्हर बर्लिन शहराबाहेर घेऊन जाईल’

एप्रिल महिन्याच्या मध्यावर सोव्हियत सैन्यांनी मारा वाढवला. अखेर बंकरमध्ये हिटलर विमनस्क अवस्थेत बसून होता, त्याला वाटत होते की कुणीतरी येऊन मला वाचवेल. पण तसे झाले नाही. तो प्रचंड हट्टी होता. जोपर्यंत ये युद्ध जिंकणार नाही तोवर हे शहर सोडणार नाही असे तो म्हणत असे. असे झाले नाही तर मी स्वत: गोळी मारून आत्महत्या करेन असे म्हटले होते. शेवटी त्याने ते खरे केले. २२ एप्रिल,१९४५ रोजी त्याने सर्वांना बर्लिंन सोडून जाण्याची मुभा दिली तेव्हा प्रेयसी इव्हा आणि त्याची स्वीय सहायकाने नकार दिला. 

करारी हिटलर भणंग झाला

जगासमोर क्रूरकर्मा असलेला हिटलर प्रचंड करारी होता. मात्र, महायुद्धातील पिछेहाट आणि मृत्यू समोर दिसू लागल्यानंतर तो भणंग झाला. त्याची अवस्था कीव करण्यासारखी होती. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते. त्याचे खांदे पडलेले आणि कपडे घाणेरडे झाले होते. तो कुठल्याही गोष्टीला थंड प्रतिसाद देत होता. त्याचा चेहरा सुजला होता आणि त्यावर असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या. त्याला मृत्यू समोर दिसत होता. त्यांचा उजवा हात इतका थरथरायचा की तो थांबवायला डाव्या हाताने पकडायचा. चालताना दारुड्या माणसासारखा अडखळत चालत असे. चालताना तो आधार घेत असे. 

लग्नाच्या सर्टिफिकेटवर तारीख चुकली

मृत्यू जवळ दिसू लागल्यानंतर त्याने इव्हा ब्राऊनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण हे लग्न कोण लावणार असा प्रश्न होता. त्याच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या गोबेल्सचं लग्न लावलेल्या वॉल्टर वॅगनरला शोधून काढले. त्याला हिटलरच्या बंकरमध्ये आणले तेव्हा तो सर्टिफिकेट विसरून आला होता. तो पुन्हा घरी गेला तेव्हा रशियन सैनिकांनी जोरदार गोळीबार सुरू केला. अशात तो मार्ग काढत बंकरमध्ये पोहोचला. या लग्नासाठी मेजवानी ठेवली होती. वॅगनरची इव्हा आणि हिटलर वाट पाहत होते. लग्नाचे साक्षीदार म्हणून गोबेल्स आणि बोरमन साक्षीदार बनले. लग्नाची वेळी रात्रीची होती परंतु सर्टिफिकेटच्या घोळात रात्रीचे १२ वाजून गेले तरी वॅगनरच्या लक्षात न आल्याने त्याने २९ तारीख घातली. वास्तविक ती ३० असायला हवी होती. मात्र, त्यामुळे फरक पडला नाही. हिटलरच्या लग्नाच्या मेजवानीला बोरमन, गोबेल्स, माग्दा गोबेल्स, जनरल क्रॅब्स, जनरल बर्गडॉर्फ, हिटलरचे दोन पीए आणि त्याचा स्वयंपाकी सहभागी झाला. 

आत्महत्येपूर्वी गाढ झोपला

हिटलरने आत्महत्या करण्याआधी तो गाढ झोपला. त्यानंतर दाढी, अंघोळ केली. आपल्या सैन्य अधिकाऱ्यांना भेटून शेवट जवळ आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आपल्या लाडक्या कुत्रीला सायनाइडची गोळी घातली तसेच तिच्या पिलांना गोळ्या घालून ठार केले. त्यांचे दफन करण्यात आले तरी त्यांना हिटलरने पाहिले नाही. दुपारी अडीच वाजता तो शेवटचा जेवला. त्यानंतर इव्हा आणि तो एका खोलीत गेले. त्याचा अंगरक्षक हिंज लिंगे हा दरवाजासमोर उभा होता तरीही त्याला समजले नाही. मात्र, बंदुकीच्या दारुचा हलकासा वास त्याला आला.  आपल्या मृत्यूआधी हिटलरने २०० लिटर पेट्रोलची व्यवस्था केली होती. त्यानंतर लिंगेने हिटलरचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि चॅन्सलरी बागेत नेला. इव्हा ब्राऊनचाही मृतदेह तिथे आणला. त्यानंतर तेथे पेट्रोलने आग लावून जाळून टाकले. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या सोवियत सैन्यांनी अवशेष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दातांच्या अवशेषापलिकडे काही मिळाले नाही. 

गोबेल्समुळे टिकवू शकला सत्ता 

एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते, ही गोबेल्सनीती म्हणून प्रसिद्ध आहे. हाच जोसेफ गोबेल्स हिटलरचा विश्वासू सहकारी होता. अखेरच्या क्षणापर्यंत त्याने हिटलरची साथ दिली. आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी, ही गोबेल्सची नीती होती आणि हेच हिटलरच्या प्रचाराचे सूत्र होते. हिटलरचा उदय होण्याआधी जर्मनीत ज्यू लोक एकोप्याने राहत होते. मात्र गोबेल्सने ज्यूविरोधी वातावरण तयार केले आणि नरसंहारही केला. मात्र जर्मनीत तो कुणाला वावगा वाटला नाही याचे कारण हे कसे बरोबर आहे हेच गोबेल्सच्या नीतीप्रमाणे हिटलर सांगत राहिला. ्‍

 

Back to top button