स्वत:लाही विसरविणार्‍या आजारावर औषध गवसले | पुढारी

स्वत:लाही विसरविणार्‍या आजारावर औषध गवसले

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

जगभरातील अल्झायमर्स या स्वत:चाही विसर पाडणार्‍या आजाराच्या कोट्यवधी रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 20 वर्षांनंतरया आजारावरील औषधाला अमेरिकन सरकारची मंजुरी मिळाली आहे. हे औषध अमेरिकेत शोधण्यात, विकसित करण्यात आले आहे. अ‍ॅड्युहेल्म नावाच्या या औषधाने जगभरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. आजार बळावणे थांबवू शकते, असे हे जगातील पहिले औषध आहे. 

औषधाच्या निर्मितीशी संबंधित असलेले डॉ. बबाक तोऊसी अमेरिकन सरकारच्या या निर्णयाने आनंदात आहेत. अल्झायमर्सवर एखाद्या औषधाला मंजुरी मिळते आहे. हे वीस वर्षांत हे पहिल्यांदा घडते आहे.  औषधाचे गंभीर साईड इफेक्ट होऊ शकतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकन अन्न व औषधे प्रशासनानेही या औषधाला मंजुरी देताना हा आक्षेप ग्राह्य धरलेला आहे. औषध उत्पादक कंपनीनेही ही बाब नाकारलेली नाही. मोठ्या प्रमाणावर औषधाचे क्‍लिनिकल ट्रायल केले जाणार आहे. जेणेकरून या औषधाच्या उपयुक्‍ततेचे ठोस आकडे उपलब्ध व्हावेत आणि साईड इफेक्टवर इलाजही शोधून काढता यावा.

भारतात अल्झायमर्सचे 15 लाखांवर रुग्ण

एकट्या भारतात अल्झायमर्स या आजाराचे 15 लाखांवर रुग्ण आहेत. अल्झायमर एक मानसिक रोग आहे. यात रुग्णाची स्मृती कमकुवत होत जाते. आजार बळावतो तेव्हा रुग्ण कुटुंबीयांनाच नव्हे तर स्वत:लाही विसरवून बसतो.

अल्झायमर्सची लक्षणे

वस्तू, गोष्टी विसरणे,  विचार करण्याची क्षमता कमी होणे,  सायंकाळच्या वेळी मानसिक स्तरावर भ्रम होणे,  एकाग्रतेची वानवा, नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता कमी होणे,  स्मृतीभ्रंश होणे,  विसर पडणे,  कुटुंबीयांनाही न ओळखणे,  स्वत:चाही विसर पडणे

 

Back to top button