'या' वाळवंटात आहे पृथ्वीवरील 'नरका'चा दरवाजा; ५० वर्षांपासून धगधगतेय आगीची ज्वाला

पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनाना काळात तुर्कमेनिस्तान हा देश वेगळ्याच कारणाने चर्चेत आला होता. कारण, इथं एकही कोरोनाची केस सापडलेली नाही. इतकंच नाही, तर कोरोना शब्द उच्चारण्यावरदेखील बंदी होती. खरंतर हा देश पूर्वीपासून एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. ते कारण म्हणजे पृथ्वीवरील ‘नरकाचा दरवाजा’ अर्थात ‘द् गेट्स ऑफ हेल’ याच देशात आहे. आश्चर्य वाटलं ना? नरक ही कल्पना आपण धार्मिक पोथी-पुराणांमध्ये ऐकलेली आहे. त्याची भीती सर्वांनाच असते. पण, अस्तित्वात आहे की नाही याबद्दल शंका आहे. पण, पृथ्वीवर विचाराल तर… तुर्कमेनिस्तानमध्ये ‘नरकाचा दरवाजा’ आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला तर, जाणून घेऊ या नरकाच्या दरवाज्याविषयी!
तुर्कमेनिस्तान हा देश खंरतर ७० टक्के वाळवंटांनीच व्यापलेला आहे. त्या वाळवंटाला काराकुम वाळवंट म्हणतात. या काराकुम वाळावंटात Darvaza नावाचा एक मोठा खड्डा आहे. .या खड्ड्यामध्ये गेली ५० वर्षांपासून सलगपणे आग धगधगत आहे. ती आग आजपर्यंत कोणाला विझवता आलेली नाही. याच स्थानाला ‘नरकाचा दरवाजा’ असं म्हंटलं जातं. वास्तविक पाहता हा खड्डा गॅस क्रेटर आहे. या खड्ड्यामध्ये जमिनीमधून कित्येक वर्षांपासून मिथेन वायू बाहेर पडत आहे. सध्या हे स्थळ पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाने स्थळ बनले आहे.
आता तुम्हाला वाटेल की, निसर्गामुळे हा खड्डा किंवा नरकाचा दरवाजा तयार झालेला आहे. पण, तसे नाही. हा मानवनिर्मित खड्डा म्हणून नोंद झालेला आहे. त्याचं झालं असं की, तुर्कमेनिस्तान पहिला सोविएत संघाचा भाग होता. १९७० च्या सुरुवातीला नैसर्गिक गॅसचा मोठा साठा असल्याचे माहीत झाले होते. त्यावेळी रशिया दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक संकटात सापडलेला होता. ही अडचण दूर करण्यासाठी गॅसचा हा मोठा साठाच आपल्याला तारू शकतो, असं रशियाला वाटलं.
तर, १९७१ मध्ये नैसर्गिक गॅस मिळविण्याच्या आशेपोटी या ठिकाणी काही संशोधक आणि इंजिनियर आले. त्यांनी काम करत असताना मोठा स्फोट घडवून आणला. त्या विस्फोटोतून काराकुमच्या वाळवंटात भला मोठा खड्डा तयार झाला. या स्फोटामध्ये जमिनीतील मिथेन गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागला. त्याला थांबवणं अशक्य झालं. मिथेनचा दर्प इतका घाणरेडा होती की तिथं थांबणं अवघड होऊन गेलं. आता मिथेन वायू थांबविण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नामी शक्कल लढवली. ती शक्कल अशी होती की, आपण हा वायू रोखण्यासाठी आग लावू. काही वेळानंतर गॅस संपला की आग विझून जाईन, अशा विचारात शास्त्रज्ञांनी मिथेन वायूला आग लावली. पण, आग काही केल्या विझली नाही. तेव्हापासून आजतागायत ५० वर्षं झाली. तरीही या खड्ड्यातील आग विझलेली नाही. यामागील कारण शोधण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र, आजदेखील त्याचे खरे कारण समजलेले नाही. ते एक रहस्यच बनून राहिले आहे.
एक फुटबाॅलच मैदान असावं इतकं मोठा हा खड्डा आहे. २२९ फूट रुंद आणि ६५ फूट खोल, असा हा खड्डा आहे. या खड्ड्यामधील आगीमुळे मिथेन आणि सल्फरचा उग्र वास वातावरणात पसरलेला असतो. ही आग इतकी भयानक आहे की, आगीच्या ज्वाला कित्येक मीटर उंच असलेल्या दिसतात. खड्ड्यात तापलेली वाळू आणि माती पाहायला मिळते. काराकुम वाळवंट जगातील मोठ्या वाळवंटांपैकी एक आहे. जिथं १० वर्षांतून एकद वेळेलाच पाऊस पडतो. असं असलं तरी, या गॅस क्रेटर किंवा या खड्ड्यात लागलेल्या आगीबद्दल वेगवेगळी मतं पाहायला मिळतात. गाईड असं सांगतात की, इथं पाण्याचा शोध लागला होता. पण, याच दरम्याम गॅस क्रेटर तयार करण्यात आले. आता इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला गाईड आपाआपाल्या बुद्धीने वेगवेगळ्या कथा सांगत असतो. पण, वास्तविक पाहता कोणालाही याचा शोध घेता आला नाही की, हा खड्डा पडला कसा आणि त्यात आग लागली कशी? आणि ही आग कधी विझली जाणार आहे, याचीही कोणाला कल्पना नाही.