Ukraine Russia War : युक्रेनकडून रशियाचा तेल डेपो उद्ध्वस्त  | पुढारी

Ukraine Russia War : युक्रेनकडून रशियाचा तेल डेपो उद्ध्वस्त 

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेल्या रशिया-युक्रेन युद्धाची (Ukraine Russia War) धग आता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. युक्रेनने रशियाच्या ब्रायन्स्क शहरात क्षेपणास्त्र हल्ला चढवला. युक्रेनच्या लष्कराने केलेल्या या हल्ल्यात रशियाचा एक तेल डेपो नष्ट झाला आहे. याच डेपोतील पाईपलाईनद्वारे युरोपला तेल पुरवठा केला जातो.

दरम्यान, पश्चिम युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी पाच रेल्वे स्थानकांवर हल्ले केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. यात शेकडो नागरिक जखमी झाल्याची शक्यता आहे.

खारकोव्ह येथे रशियाने हल्ले वाढवले असले तरी तेथून पुढे जाण्यात रशिया अपयशी ठरला आहे. येथे रशियाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे काही भागातून रशियाला माघार घ्यावी लागत आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. तर ओडेसा येथे रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत. (Ukraine Russia War)

काळ्या समुद्रात अजूनही रशियाची दोन डझनहून अधिक जहाजे आणि पानबुड्या तैनात आहेत. त्यामुळे युक्रेनवर समुद्रातून हल्ल्याची टांगती तलवार कायम आहे. झपोरिझिया पोलाद प्रकल्पातून 50 टक्के क्षमतेसह पुन्हा उत्पादन सुरू केल्याची माहिती येथील प्रमुखांनी दिली आहे.

युक्रेन युद्ध जिंकेल : पेंटॅगॉन (Ukraine Russia War)

अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनचे प्रमुख लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, जर युक्रेनला योग्य शस्त्रास्त्रे आणि पाठिंबा मिळाला तर हे युद्ध युक्रेन जिंकू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी रविवारी कीव्ह येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. यावेळी युक्रेनला 700 दशलक्ष डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत देण्याची घोषणाही केली आहे.

Back to top button