Ukraine Russia War : युक्रेनमध्ये रशियन कमांडरचा ‘गँगरेप’चा आदेश | पुढारी

Ukraine Russia War : युक्रेनमध्ये रशियन कमांडरचा ‘गँगरेप’चा आदेश

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : ‘सेपरेट मोटराईझ्ड रायफल ब्रिगेड’चा कमांडर अझात्बेक ओमुरबेकोव्ह… वय वर्षे 40… 400 युक्रेनियनांचे कब्रस्तान बनलेल्या युक्रेनमधील (Ukraine Russia War) बुचा शहराच्या गुन्हेगाराचा हा एका वाक्यातील परिचय आहे. रशियन शौर्यपदकाने सन्मानित असलेल्या या ‘क्रौर्या’ने म्हणजेच अझात्बेक ओमुरबेकोव्हने युक्रेनियन मुलींवर सामूहिक बलात्काराचा आदेश आपल्या सैनिकांना दिलाच, पुरुषांचे काय करायचे म्हणून 50 पेक्षा कमी वयाचे असतील त्या सगळ्यांना मारून टाका, असेही बजावले… सैनिकांनी दोन्ही आदेश शिरसावंद्य मानले… आणि मानवतेला मग कुणी वालीच उरला नाही…

‘डेली मेल’ या ब्रिटनमधील वृत्तपत्राने अझात्बेकला ‘बुचाचा बुचर’ (कसाई) ही सार्थ उपमा दिली आहे. अवघे जग अझात्बेकला ‘बुचर ऑफ बुचा’ म्हणून हिणवत आहे; पण अझात्बेक आपल्याच मस्तीत आहे. विशेष म्हणजे, अझात्बेकचा ईश्वराच्या अस्तित्वावर अगाध विश्वास आहे. निरपराध लोकांवर मशिनगन्सनी बेसुमार गोळ्या झाडल्यानंतर उरलेल्या नातेवाईकांना दफनविधीसाठी त्याने मोजून 20 मिनिटे दिली होती. (Ukraine Russia War)

अझात्बेक ओमुरबेकोव्हने गतवर्षी ऑर्थोडॉक्स चर्चच्या फादरकडून आशीर्वादही घेतला होता. तद्नंतर तो म्हणाला होता, ‘बहुतांश युद्धे आम्ही आमच्या अंतरात्म्याशीच लढत असतो, याची साक्ष स्वत: आमचा इतिहास आहे. शस्त्रांचे महत्त्व आमच्या लेखी फार नाही!’

बुचातील एक रहिवासी अझात्बेकचा कहर आठवताना नखशिखांत शहारलेला असतो… हा रहिवासी म्हणतो, ‘रशियन सैनिक आले आणि त्यांनी आमच्याकडे आमची कागदपत्रे मागितली. लष्कराची खुण (आर्मी टॅट्यू) दिसावी म्हणून सर्वांना कपडे उतरवायला सांगितले. पुसटसा संशयही ज्याच्यावर आला, त्याला तत्क्षणी गोळ्या घातल्या.’

भारताकडूनही चौकशीची मागणी 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानेही बुचा नरसंहाराच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निरपराध नागरिकांच्या हत्याकांडाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. बुचा नरसंहाराचा भारत निषेध करतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले.

Back to top button