रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह भारत दौर्‍यावर | पुढारी

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह भारत दौर्‍यावर

नवी दिल्ली ; पीटीआय : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह हे दोन दिवसीय भारत दौर्‍यावर येत आहेत. 31 मार्च ते 1 एप्रिल असा त्यांचा हा दौरा असेल. युक्रेनवर आक्रमण केल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर हा दौरा व्यापार द़ृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत माहिती दिली आहे. या दौर्‍यात दोन्ही देशांमध्ये पाश्चिमात्य देशांनी रशियन बँकांवर लावलेल्या निर्बंधांनंतर पेमेंट सिस्टिम सुलभ करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. रशियाकडून सवलतीत कच्च्या तेलाच्या खरेदीचा व्यवहार रूबलद्वारे करण्यावर या भेटीत चर्चा अपेक्षित आहे. रुपया-रूबल अशी नवी व्यापार प्रणाली स्थापन करण्यावर विचार होऊ शकतो. दोन्ही देशातील व्यापार सुलभ करण्याचा द़ृष्टीने कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी आरबीआयला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचेही समजते.

पाश्चिमात्य राष्ट्रांचा भारतावर दबाव?

अर्थात भारताला ही भेट अत्यंत सावधपणे आणि कुटनीतीने करावी लागणार आहे. कारण पाश्चिमात्य देशांचा दबाव भारतावर असणार आहे. सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या भेटीवेळीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग, ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लीझ ट्रुस आणि जर्मनीचे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण सल्लागार जेन्स प्लॉटनर हेदेखील याच काळात भारतात असणार आहेत. ट्रुस हे 31 मार्चलाच भारतात येत असून सिंग हे 31 मार्च ते 1 एप्रिल या काळात भारत दौर्‍यावर आहेत.

Back to top button