कीव्ह : आतापर्यंत 10 लाख युक्रेन नागरिक परागंदा | पुढारी

कीव्ह : आतापर्यंत 10 लाख युक्रेन नागरिक परागंदा

कीव्ह : पुढारी वृत्‍तसेवा : गेल्या दहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मधील युद्धाचा भडका कायम आहे. या दरम्यान युक्रेनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शेजारील देशात स्थलांतरण केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रशियाच्या हल्ल्यानंतर गेल्या आठ दिवसांत सुमारे 10 लाख युक्रेनी नागरिकांनी स्थलांतरण केले आहे. गेल्या 100 वर्षांतील युक्रेनमधील सर्वाधिक नागरिकांचे हे स्थलांतरण आहे.

पलायन करणार्‍या नागरिकांचा आकडा युक्रेन च्या लोकसंख्येच्या 2 टक्केपेक्षा अधिक आहे. युक्रेनी नागरिकांनी रोमानिया, पोलंड, मोलडोव्हा, स्लोव्हाकिया आणि हंगेरीच्या आश्रयाला गेले होते. यातील 6.5 टक्के युक्रेनी नागरिक शेजारील देश पोलंडमध्ये शरण गेले आहेत, तर यातील 53 हजार युक्रेनी नागरिक रशियामध्येही पोहोचले आहेत.

युक्रेनचे संयुक्त राष्ट्र संघातील प्रतिनिधी कॅरोलिना लिंगडोम म्हणाले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असले तरी युद्धाचा फटका बसलेली मोठी लोकसंख्या अद्याप देशात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

युक्रेनमधील सुमारे 10 लाख नागरिक देशांतील अन्य भागात स्थलांतरित झाले आहेत. ते रेल्वे, बस आणि मोटारींच्या माध्यमातून सुरक्षितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिंगडोम यांनी म्हटले आहे.

40 लाख नागरिकांचे पलायन होण्याची भीती

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2020 पर्यंत युक्रेनची लोकसंख्या 4.4 कोटी होती. युद्धाची परिस्थिती आणखी चिघळल्यास सुमारे 40 लाख युक्रेनी नागरिक स्थलांतर करतील, अशी भीती आहे.

Back to top button