युद्धाचा धोका वाढला; जो बायडेन यांनी बोलावली सुरक्षा परिषदेची बैठक! | पुढारी

युद्धाचा धोका वाढला; जो बायडेन यांनी बोलावली सुरक्षा परिषदेची बैठक!

वॉशिंग्टन/मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेन आणि रशियादरम्यान युद्ध केव्हाही पेटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली आहे. तीन बॅलेस्टिक तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांसह युद्धसराव सुरू आहे. रशियाने हल्ल्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी अणुहल्ल्याच्या पर्यायाचाही विचार करीत आहे, असे बायडेन यांनी या बैठकीत सांगितले.

दुसरीकडे जी 7 समूहातील कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिकेसह युरोपियन संघाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी एक संयुक्‍त वक्‍तव्य केले आहे. याअंतर्गत युक्रेनवर हल्ला केल्यास रशियाला त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील. रशियावर आम्ही सर्व मिळून आर्थिक निर्बंध तर लादणारच आहोत, असा त्यांचा सूर आहे.

अमेरिका, ‘नाटो’वर युक्रेन संतप्‍त

युक्रेन आणि रशियादरम्यान युद्धाचे ढग दाटलेले असताना अमेरिका आणि नाटो फौजा म्हणायला तर युक्रेनसोबत आहेत; पण दस्तुरखुद्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर जेलेन्स्की यांनी अमेरिका आणि नाटो फौजांवर कोरडे ओढले आहेत. तुम्ही आम्हाला मदत करण्यासाठी रशियाने आमच्यावर हल्ला करावा, अशी वाट बघत आहात काय, असा सवाल त्यांनी या दोघांना उद्देशून केला आहे. आमचे सहकारी रशियाविरुद्ध निर्बंधांचे फक्‍त इशारेच देत आहेत, असेही जेलेन्स्की यांनी उपरोधाने म्हटलेले आहे.

हल्ल्याची वाट बघताय काय?

जेलेन्स्की यांचे हे वक्‍तव्य बायडेन प्रशासनावर साधण्यात आलेला निशाणाच आहे, असे ‘न्यूयॉर्क टाईम्स’च्या एका वृत्तात थेट म्हटलेले आहे. रशियाला वेसण घालण्यासाठी अमेरिकेकडून कुठलीही ठोस कृती अद्याप झालेली नाही, असेही या वृत्तात नमूद केले आहे. आमची अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडण्याची तुम्ही वाट बघत आहात काय? आमच्या देशातील अनेक भागांवर शत्रूने ताबा मिळविण्याची वाट बघत आहात काय? रशियाने हे सगळे करून झाल्यानंतर तुम्ही रशियावर निर्बंध लादले तरी ते आमच्या काय उपयोगाचे? असे उद्विग्‍न सवालही जेलेन्स्की यांनी म्युनिच येथे झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत उपस्थित केले आहेत. अर्थात, मित्रदेशांनी आजवर केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानायलाही ते विसरले नाहीत.

आम्ही रशियाला अजिबात घाबरलेलो नाही. आमच्यावर हल्ला झाल्यास प्रतिहल्ल्याने आम्ही त्याला उत्तर देऊ, असा इशाराही जेलेन्स्की यांनी पुतीन यांना उद्देशून दिला.

युक्रेन राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

‘मी स्वत: रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा करू इच्छितो. चर्चेतून मार्ग शोधणे, हाच उत्तम पर्याय आहे. याआधी रशियाने 1994 मध्येही आमच्यावर हल्ला केला होता. तेव्हाही पाश्‍चिमात्य देशांनी आम्हाला मदत केली नव्हती. सोविएत संघाचे विघटन झाले तेव्हा आमची अण्वस्त्रे रशियाच्याच ताब्यात राहून गेली. क्रिमिया या आमच्या देशाचा एक मोठा भाग रशियाने बळकावला. स्वित्झर्लंड, बेल्जियम, नेदरलँडपेक्षाही हा भाग आकाराने मोठा आहे. मी एक गोष्ट छातीठोकपणे सांगतो. तुम्ही (अमेरिका, नाटो) साथ द्याल अगर न द्याल, आम्ही आमच्या देशाचे रक्षण करणार.’

युक्रेनमधील भारतीयांसाठी दूतावासाचे निर्देश

रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धसद‍ृश स्थितीमुळे भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीयांसाठी तातडीचे निर्देश जारी केले असून, काही काळासाठी युक्रेन सोडून भारतात परतण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Back to top button