कोरोना निर्बंधांविरोधात कॅनडामध्ये उद्रेक! | पुढारी

कोरोना निर्बंधांविरोधात कॅनडामध्ये उद्रेक!

ओटावा ; वृत्तसंस्था : कॅनडा चे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या ‘सक्‍तीचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण’ आणि ‘लॉकडाऊन’ या निर्णयांविरोधात ट्रकचालकांनी तीव्र आंदोलन केले. पंतप्रधान ट्रुडो यांच्या निवासस्थानाला 50 हजार ट्रकचालकांनी घेराव घातला. लोकांचाही ट्रकचालकांना पाठिंबा मिळाल्याने ट्रुडो यांच्या निवासस्थानाचा संपूर्ण परिसर ठप्प झाला. ट्रुडो यांनी घरातून गुपचूप काढता पाय घेतला. ते आता अज्ञातस्थळी आहेत.

ट्रकचालकांना ट्रुडोंच्या विरोधातील अन्य आंदोलकांचाही पाठिंबा मिळाल्याने कॅनडातील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आताच परिस्थिती भीषण आहे. ओटावात जवळपास 20 हजार ट्रक दाखल आहेत.

ट्रकच्या रांगा जवळपास 70 कि.मी.पर्यंत आहेत. ट्रकचालकांनी 70 कि.मी. लांबीच्या आपल्या ताफ्याला ‘फ्रीडम कॉन्व्हाय’ असे नाव दिले आहे. अमेरिकन सीमा पार करायची, तर कोरोना लस बंधनकारक करण्यात आली आहे. हजारो ट्रकचालकांचा यास विरोध आहे.

अशात जस्टिन ट्रुडो यांनी ट्रकचालकांना ‘अल्पसंख्याक’ हे विशेषण लावले. त्यामुळे हा वर्ग अधिकच भडकला. आता राजधानी ओटावाच्या रस्त्यांवर सर्वत्र ट्रकच ट्रक दिसत आहेत. चालक सातत्याने हॉर्न वाजवून सरकारचा निषेध करत आहेत. ट्रकचालक संसद परिसरातही दाखल झाले आहेत.

बोलणे लागले जिव्हारी

कॅनडा चे पंतप्रधान आपल्या कुटुंबासह घरातून सुरक्षित आणि गोपनीय ठिकाणी पळून गेले आहेत. लसीला, लॉकडाऊनला विरोध करत असलेले ट्रकचालक अडाणी, मागास आहेत आणि ते संपूर्ण कॅनडासाठी धोका आहेत, हे ट्रुडो यांचे वक्‍तव्य ट्रकचालकांच्या जिव्हारी लागले आहे.

Back to top button