साथरोग कायम राहत नाही, कोरोना चालू वर्षात संपणार | पुढारी

साथरोग कायम राहत नाही, कोरोना चालू वर्षात संपणार

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : कोणताही साथीचा रोग हा कायमस्वरूपी राहत नाही. कोरोना ही कायमस्वरूपी राहू शकणार नाही. नवा विषाणू आला की, आपण मास्कमागे लपतो. हा एकप्रकारचा खेळ सुरू आहे… लवकरच विषाणूवरही लपण्याची वेळ येईल… आणि या क्षणाच्या आपण खूप जवळ आलेलो आहोत, असे आश्‍वस्त करणारे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विषाणू तज्ज्ञ तसेच जागतिक लस विकास प्रकल्पाचे संचालक डॉ. कुतूब मेहमूद (सिएटल, वॉशिंग्टन) यांनी व्यक्‍त केले.

जसजसे हे वर्ष पुढे सरकत जाईल, तसतसे आपण या महामारीतून बाहेर पडत जाऊ, असेही डॉ. कुतूब म्हणाले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. कुतूब बोलत होते. लसीकरण हे कोरोनाविरुद्ध लढ्याचे सर्वात मजबूत शस्त्र आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

विषाणूसाठी आणि मानवासाठीही अस्तित्वाची लढाई असते. विषाणूसमोर उत्परिवर्तित होण्याचे आव्हान असते तसेच मानवाच्या बदलत्या प्रतिकारकशक्‍तीशी जुळवून घेण्याचेे आव्हान असते. उत्परिवर्तनात विषाणू आपले रूप बदलतो आणि त्या-त्या हिशेबाने मानवाच्या प्रतिकारकशक्‍तीतही अपेक्षित बदल होत जातो.

आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. लस, अँटिव्हायरल आणि अँटिबॉडिज् ही आयुधे आपल्याकडे आहेत. विषाणूकडे उत्परिवर्तनाचे शस्त्र आहे. आपले (मानवाचे) लस हे विषाणूविरुद्धच्या लढ्यातील सर्वाधिक परिणामकारक शस्त्र आहे. त्यामुळेच मला 60 टक्के लसीकरणाचे ध्येय गाठल्याबद्दल भारत सरकारचे कौतुक करावेसे वाटते, असे डॉ. कुतूब यांनी सांगितले

Back to top button