कोरोना विषाणूचा धोका ठरवणारे जनुक शोधण्यात विज्ञानाला यश | पुढारी

कोरोना विषाणूचा धोका ठरवणारे जनुक शोधण्यात विज्ञानाला यश

वार्सा ; वृत्तसंस्था : पोलंडमधील वैज्ञानिकांना कोरोना विषाणूच्या बाधेआधीच धोका ठरवणारे जनुक शोधण्यात यश आले आहे. त्यामुळे आता कोणत्या लोकांना कोरोनाचा अधिक धोका आहे, हे ओळखणे शक्य होईल. गेल्या दीड वर्षापासून हे संशोधन यशस्वी झाले आहे.

एखाद्याला कोरोना होतो आणि तो उपचाराशिवायही बरा होऊन जातो आणि दुसरीकडे लक्षावधी लोकांना या विषाणूच्या संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या कारणानेच कोरोनाच्या विषाणूचा धोका ओळखणे हे मोठे आव्हान होते.

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, अशांना तर या संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका कुणाला आहे आणि कोण कोरोना संसर्गाच्या साखळीतील दुवा बनू शकतो, याची उत्तरे मिळविणे या संशोधनाने शक्य होणार आहे.

कोरोनाचा धोका कुणाला अधिक आहे, हे ओळखता आल्याने अशा नागरिकांसाठी प्राधान्याने लसीकरणापासून इतर उपचारांची व्यवस्था करता येईल. मृत्यू संख्यादेखील त्यामुळे आटोक्यात येईल. वय, वजन, लिंग या 3 घटकांपाठोपाठ हे जनुक कोरोनाचा धोका ठरवणारा चौथा महत्त्वाचा घटक आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

भारतासाठी संशोधन फार महत्त्वाचे

हे जनुक ‘क्रोमोझोम 3’वर अस्तित्वात असते. ‘क्रोमोझोम 3’ हे मानवाच्या शरीरातील 23 क्रोमोझोमच्या जोड्यांपैकी एक असते. ‘क्रोमोझोम 3’ या जनुकाचे अस्तित्व असणे म्हणजेच अशा व्यक्‍तीला कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अधिक असणे होय. भारतात 27 टक्के लोकसंख्येत हे जनुक आढळते. त्यामुळे आपल्या (भारताच्या) द‍ृष्टीने हे संशोधन मैलाचा दगड ठरू शकेल, असेच आहे.

Back to top button