विस्तारवादी चीनने हडपला भूतानचा भूभाग | पुढारी

विस्तारवादी चीनने हडपला भूतानचा भूभाग

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : चीन हा देश शेजारी देशांच्या भूभागावर सातत्याने अतिक्रमण करतो आहे. विस्तारवादी धोरणांतर्गत चीनने भूतान सोबतच्या वादग्रस्त सीमेवर 200 हून अधिक दुमजली इमारतींचे बांधकाम सुरू केले आहे. उपग्रहीय छायाचित्रांतून ही बाब समोर आली आहे.

‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने केलेल्या उपग्रहीय छायाचित्रांच्या विश्लेषणानुसार, वादग्रस्त भागात 6 ठिकाणी चीनच्या बांधकामाला वेग आलेला आहे. अमेरिकन डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म ‘हॉकआय-360’ने ही छायाचित्रे ‘रॉयटर’ला उपलब्ध करून दिली.

‘हॉकआय-360’चे मोहीम संचालक क्रिस बिगर्स यांनी सांगितले की, भूतानच्या पश्चिम सीमेसह काही अन्य ठिकाणांवर चीनच्या या हालचाली 2020 च्या सुरुवातीपासूनच चालू झाल्या. ‘हॉकआय-360’ची ही छायाचित्रे तारीख, महिना व वर्षनिहाय आहेत. यावरून आधीची रिकामी जागा व नंतर झालेल्या बांधकामातील प्रगतीचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

भूतानच्या मालकीच्या जवळपास 110 चौरस किलोमीटरच्या एका भागातही चीनने बांधकामे केली आहेत. वृत्तसंस्थेने भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क केला असता, सीमावादाबद्दल सार्वजनिकरीत्या काहीही न सांगण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगण्यात आले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, ही बांधकामे म्हणजे स्थानिक लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दिशेने चाललेल्या कामांतील एक भाग आहे.

भारत, भूतान आणि चीनच्या सीमा जेथे मिळतात, त्या डोकलामपासून चीनने केलेल्या बांधकामांचे ठिकाण अवघे 27 कि.मी. अंतरावर आहे आणि याच ठिकाणी 2017 मध्ये भारत-चीन वाद उफाळून आला होता. भारतीय जवान आणि चिनी सैनिक सलग दोन महिने समोरासमोर होते.

Back to top button